Sassoon drug case : ड्रग तस्कर ललीत, भूषणच्या नातेवाइकांची झाडाझडती

Sassoon drug case : ड्रग तस्कर ललीत, भूषणच्या नातेवाइकांची झाडाझडती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित आणि भूषण पाटील, त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांच्या नाशिक येथील घरी शनिवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने धडक दिली. पाटील बंधूंचे आई-वडील, ललितची वकील मैत्रीण आणि बलकवडे याच्या पत्नीची चौकशी त्यांनी केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, त्यामध्ये या नातेवाइकांनी आपली मुले आणि पती काय काम करतात, याची माहिती नसल्याचे सांगितले.

ललीत पाटील हा ससूनमधून ड्रग रॅकेट चालवत होता. त्याचा भाऊ भूषण त्याला मदत करीत होता. बलकवडे हा भूषणचा साथीदार आहे. हे तिघे अद्याप फरार आहेत. त्यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके तैनात केली आहेत. तो फरार झाल्यापासून आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी त्यांचा सुगावा पोलिसांना लागला नाही.

गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी नाशिक येथे पाटील आणि बलकवडे या दोघांच्या घरी धडक दिली. पाटीलच्या घरी त्याचे आई-वडील होते. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. आमची मुले काय करतात, हे आम्हाला माहिती नाही. तसेच ती कोठे आहेत, हेसुद्धा माहिती नाही. मात्र, राऊटरद्वारे (वायफाय) हे पाटील याला बोलत होते. त्यांना मुले कोठे आहेत, हे माहिती नाही. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॉल कसा करायचा, सिम कार्डद्वारे कॉल करायचा नाही, याची नेमकी माहिती असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.

सध्यातरी पाटीलच्या घरातून पोलिसांना महत्त्वाचे असे काही हाती लागले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बलकवडे याच्या घरीसुद्धा पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांनीदेखील तो काय काम करतो, हे माहिती नसल्याचे सांगितले. बलकवडे हा पाटील अ‍ॅग्रो फर्मचे काम पाहत असल्याचे भूषण पाटील याने दाखविले आहे. त्यामुळे जोपर्यंत या तिघांपैकी कोणी एक जण पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत 'पलायन एक अन् सवाल अनेक' हे मात्र कायम असणार.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news