Vijay Wadettiwar : कंत्राटी नोकर भरतीतील भ्रष्टाचार बाहेर काढणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा | पुढारी

Vijay Wadettiwar : कंत्राटी नोकर भरतीतील भ्रष्टाचार बाहेर काढणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कंत्राटी भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, अमेदवारांकडून पैसे उकळण्यात येत आहेत. या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे आहेत. याबाबत चित्रफीत माझ्याकडे येणार असून, मुंबईमध्ये त्याचा भांडाफोड करण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यातील शाळा आणि दवाखान्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. याचा विरोध आम्ही करीत आहोत, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वडेट्टीवार म्हणाले, ’कंत्राटी भरतीच्या निर्णयाची होळी करा, असे आवाहन राज्यातील युवकांना केले आहे. कंत्राटी भरतीच्या धोरणामुळे आरक्षण धोक्यात आले असून, बेरोजगारांची फौज राज्यात उभी राहणार आहे. त्यामुळे या निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करणे गरजेचे आहे.’ सरकारला युवकांच्या मतांची गरज नाही, असेच चित्र आहे. आगामी काळात हेच युवक सरकारला धडा शिकवतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

पुणे आणि चंद्रपूर येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकींमध्ये पराभव होत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे पोटनिवडणुका जाहीर होत नसल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच राज्यांच्या निवडणुका होत असून, यातील छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपशी थेट लढत आहे. या ठिकाणी नक्कीच विजय प्राप्त होईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

एसआयटीमार्फत चौकशी करावी…

ससून हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांचा अड्डा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांचे मृत्यूंचे प्रमाण
वाढत असताना, गुन्हेगारांनी ससून रुग्णालयात अड्डा बनवला आहे. गंभीर गुन्ह्यांची नोंद असणार्‍या 9 गुन्हेगारांनी त्यांचा ठिय्या रुग्णालयात मांडला आहे. या गुन्हेगारांमध्ये अमली पदार्थ तस्कर होता. हे गुन्हेगार आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी नाहीत, तर मजा मारण्यासाठी आणि आपल्या व्यवसाय चालविण्यासाठी आहेत. राजाश्रयाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे या सर्व प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा

नाशिक : चौक मंडईतील दुकानांना अचानक आग, लाखो रुपयांचे नुकसान

न्यूमोनियापासून बचावासाठी उपयुक्त ठरणार हिमोफिलस लस

Lok Sabha Election : पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची तीन जागांवर नजर

Back to top button