Pimpri News : बालरोग विभाग पूर्ण क्षमतेने भरलेला; तातडीने हालचाली गरजेच्या

Pimpri News : बालरोग विभाग पूर्ण क्षमतेने भरलेला; तातडीने हालचाली गरजेच्या
Published on
Updated on

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी – संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत बालरुग्णांसाठी असलेला वॉर्ड पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्याचप्रमाणे, नवजात बालकांसाठी असलेल्या एनआयसीयूवरदेखील अतिरिक्त ताण पडत आहे.
त्यामुळे त्याची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तातडीने हालचाली गरजेच्या आहेत. वायसीएम रुग्णालयात फिरल्यानंतर एकीकडे सरकारी रुग्णालयाचा बाज दिसतो. तर, दुसरीकडे काही मजल्यांवर रुग्णालयाचा बदलता कॉपोरेट लूक नजरेत भरतो.

काही वॉर्डांमध्ये रंग उडालेल्या भिंती सरकारी रुग्णालयाची जाणीव करून देतात. तर, सहाव्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभागासाठी तयार झालेल्या दोन वॉर्डांमध्ये फिरल्यानंतर कॉर्पोरेट रुग्णालयात फिरत असल्यासारखे वाटते. विविध आजारांनी पीडित नागरिक येथे दररोज उपचारासाठी येतात. सकाळी केसपेपर काढण्यासाठी लांबच लांब रांग लागलेली पाहण्यास मिळते.

बालरोग विभागावर पडतोय ताण

रुग्णालयाच्या बालरोग विभागावर सध्या ताण पडत आहे. येथे 40 खाटांची सोय आहे. मात्र, त्या पूर्ण क्षमतेने भरल्या आहेत. येथे उपचारासाठी येणार्या मुलांचे प्रमाण वाढलेले असल्याने या विभागाची क्षमता 60 खाटांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे.

नातेवाइकांची गैरेसोय

रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर फिरल्यानंतर पॅसेजमध्ये विविध ठिकाणी नातेवाईक बसले असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. त्यांना बसण्यासाठी किंवा रात्री रुग्णाकडे थांबावे लागल्यास झोपण्यासाठी व्यवस्था नसल्याने वॉर्डबाहेरील पॅसेजमध्ये त्यांना ठिय्या मांडावा लागत आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

रुग्णालयामध्ये सध्या न्युरोसर्जन, युरोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्कोसर्जन, ऑन्को फिजिशियन, ऑन्कोरेडिओथेरपीस्ट आदींची कमतरता जाणवत आहे. रुग्णालयामध्ये सध्या 315 डॉक्टर आहेत. त्यामध्ये आस्थापनेवरील, मानधन तत्त्वावरील तसेच पदव्युत्तर विद्यार्थी यांचा समावेश आहे. तर, 439 परिचारिकांमध्ये आस्थापनेवरील, मानधन तत्त्वावरील आणि कंत्राट तत्त्वावरील परिचारिकांचा समावेश आहे. (क्रमशः )

बालकांच्या अतिदक्षता विभागातही अडचण

बालकांसाठी असलेल्या एनआयसीयूची (अर्भक अतिदक्षता विभाग) क्षमता 25 खाटांची आहे. तर, पीआयसीयूमध्ये (बालकांचा अतिदक्षता विभाग) 5 खाटांची सोय आहे. या दोन्ही विभागांमध्ये उपचारासाठी दाखल होणार्या अर्भक आणि बालकांची संख्या जास्त असल्याने या विभागांमध्ये देखील खाटांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

स्त्री रोग विभागातील काही भाग संत तुकारामनगर-मासुळकर कॉलनी येथे स्थलांतरित केल्यास बालरोग विभागासाठी आणखी खाटांची सोय करता येणार आहे. त्याचप्रमाणे, पीआयसीयूमध्ये 10 खाटांपर्यंत तर, एनआयसीयूमध्ये 35 खाटांपर्यंत क्षमता वाढविण्याचे नियोजन सुरु आहे. नातेवाईकांना राहण्यासाठी रुग्णालयाशेजारी उभारलेल्या नवीन इमारतीत नोव्हेंबर महिन्यात रात्र निवार्याची सोय केली जाणार आहे. तेथे, 100 नातेवाईक राहू शकतील.

– डॉ. राजेंद्र वाबळे,
अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news