Satej Patil vs Shoumika Mahadik : सतेज पाटील -शौमिका महाडिक की आणखी कोण? जिल्हाभरात उत्सुकता | पुढारी

Satej Patil vs Shoumika Mahadik : सतेज पाटील -शौमिका महाडिक की आणखी कोण? जिल्हाभरात उत्सुकता

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्यावेळी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात गाजलेल्या विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचे बिगुल वाजले असून, यावेळीही पुन्हा पालकमंत्री सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यातच सामना रंगण्याची शक्यता आहे. मंत्री पाटील यांच्याविरोधात माजी आ. महादेवराव महाडिक, माजी जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक की महाडिक कुटुंबातील आणखी कोण? याबाबत जिल्हाभरात प्रचंड उत्सुकता आहे. (Satej Patil vs Shoumika Mahadik)

जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील व माजी आ. महादेवराव महाडिक यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांना मदत करूनही महाडिकांनी त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री पाटील यांच्याविरोधात काम केले.

Satej Patil vs Shoumika Mahadik : त्यामुळे महाडिक यांनी बंडखोरी केली

या निवडणुकीत मंत्री पाटील पराभूत झाले. त्यामुळे पाटील आणि महाडिक गटात टोकाचा संघर्ष सुरू झाला. सन 2015 ला विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि मंत्री पाटील यांनी पुन्हा कंबर कसली. विधान परिषदेची उमेदवारी मिळविण्यासाठी मंत्री पाटील यांनी प्रयत्न सुरू केले. या मतदारसंघातून दीड तप प्रतिनिधित्व करणारे महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे विद्यमान आमदार असतानाही त्यांचा पत्ता कट करत काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात मंत्री पाटील यशस्वी ठरले. त्यामुळे महाडिक यांनी बंडखोरी केली. या निवडणुकीत मंत्री पाटील यांनी 63 मतांनी महाडिक यांना पराभूत केले होते.

यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिक यांच्या हातून एक एक सत्ताकेंद्र काढून घेण्यास पालकमंत्री पाटील यांनी सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा, तर विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांचा पराभव केला. जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणारे ‘गोकुळ’ही त्यांच्याकडून काढून घेतले. त्यामुळे या विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री पाटील यांच्याविरोधात महाडिक कुटुंबातून कोण लढणार, यावर गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांची नावेही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

81 मतदार कमी

गेल्या विधान परिषद निवडणुकीत महानगरपालिकेतील 81 नगरसेवक मतदार होते. मात्र, आता महापालिकेची मुदत संपल्यामुळे ही मते कमी होणार आहेत. यातील बहुतांशी मते ही काँग्रेसला मानणारी होती. जिल्हा परिषदेची 67 मते आहेत. अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मात्र जिल्हा परिषदेतील पारडे फिरले आहे. येथे महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या आता 41 इतकी आहे.

इचलकरंजी नगरपालिकेत काँग्रेसचे 19, भाजपचे 17, ताराराणी आघाडी 13, राजर्षी शाहू आघाडी 11, राष्ट्रवादी 7, शिवसेनेच्या 1 सदस्याचा समावेश आहे. कागल नगरपालिकेत मुश्रीफ, मंडलिक गटाचे 12, तर भाजपचे 9 सदस्य आहेत. पन्हाळा नगरपालिकेत जनसुराज्य शक्तीचे 12 व स्थानिक आघाडीचे 5, तर कुरूंदवाडमध्ये राष्ट्रवादी 5, काँग्रेस 6, भाजप 5 व अपक्ष 1 अशी सदस्यसंख्या आहे. मुरगूड नगरपालिकेत शिवसेनेचे 14, राष्ट्रवादीचे 2, तर 1 अपक्ष नगरसेवक आहे.

जयसिंगपूरमध्ये आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाचे 12 व भाजप-ताराराणी आघाडीचे 9 सदस्य आहेत. वडगाव नगरपालिकेत युवक क्रांती आघाडी 13 व विजयसिंह यादव गटाचे 4, तर गडहिंग्लजमध्ये जनता दल विकास आघाडीचे 14 आणि राष्ट्रवादीचे 5 सदस्य आहेत. हुपरी नगरपालिकेत भाजपचे 8, ताराराणी आघाडी आवाडे गट 5, मनसे, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी दोन सदस्य आहेत.

2015 मधील मते

एकूण मते 382

सतेज पाटील 220

महादेवराव महाडिक 157

बाद मते 5

Back to top button