झोपडपट्टीत शून्य कचरा उपक्रम बारगळला ; दुसर्‍या वर्षीही सुरुवात नाही | पुढारी

झोपडपट्टीत शून्य कचरा उपक्रम बारगळला ; दुसर्‍या वर्षीही सुरुवात नाही

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्य्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा तेथेच जिरविण्याचा झिरो वेस्ट (शून्य कचरा) हा उपक्रम सुरू करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागास अपयश आले आहे. सलग दोन वर्षे महात्मा गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबरला हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. हा उपक्रम अद्याप कागदावरच आहे. शहरात घोषित व अघोषित अशा एकूण 95 झोपडपट्ट्या आहेत. शहरातून दररोज 1 हजार 200 टन कचरा दररोज जमा होता. ओला, सुका, मिश्र, हॉटेल, मंडई, ग्रीन, चिकन अशा प्रकारचा हा कचरा असतो. त्यातील सुका कचरा वेगळा करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे.

तर, ओल्या कचरा मोशी कचरा डेपोत डम्प केला जातो. प्लास्टिकपासून इंधन तयार केले जात असल्याचा दावा पर्यावरण अभियांत्रिकी विभाग करीत आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर महापालिकेने पालिका व खासगी शाळांमध्ये झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. अशा पर्यावरणपूरक शाळा व महाविद्यालयांना मिळकतकरात सूट देण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने झोपडपट्टी भागातही झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत आहे. एमआयडीसी, भोसरीतील 398 घरांच्या गवळीमाथा झोपडपट्टीतून हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन घंटागाडीत कचरा जमा केला जातो. तो कचरा जवळच्या गुलाब पुष्प उद्यानातील शेडमध्ये जमा केला जातो. त्यातील सुक्या कचर्यांचा पुनर्वापर केला जातो. तर, ओल्या कचर्यापासून खत तयार केले जाते. त्या खताची महापालिका व इतरांना विक्री केली जाते. झोपडपट्टीतील स्थानिक महिला बचत गटाद्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी महापालिका सहकार्य करीत आहे.

संबंधित बातम्या :

 

त्याप्रमाणे सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातील एका झोपडपट्टीत झिरो वेस्ट संकल्पना राबविण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मोरवाडी, रावेत-किवळे, इंद्रायणीनगर, पिंपळे निलख, शांतीनगर-भोसरी, फुलेनगर, शास्त्रीनगर-पिंपरी, दापोडी अशा 8 ठिकाणी त्यासाठी कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे काम स्थानिक महिला बचत गटांना देण्यात आले आहे. त्याची सुरुवात 2 ऑक्टोबरला करण्यात येणार होती. मात्र, अद्याप शेड निर्माण न झालेले नाहीत. तसेच, इतर कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे 2 ऑक्टोबरचा मुहूर्त गाठता आलेला नाही.

सलग दोन वर्षे आरोग्य विभागास शहरातील आठ झोपडपट्टीत झिरो वेस्ट हा उपक्रम सुरू करता आलेला नाही. 2 ऑक्टोबर 2022 आणि 2 ऑक्टोबर 2023 असे दोन वेळा या उपक्रमाची केवळ घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात उपक्रम सुरू झालेला नाही. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. आठ झोपडपट्टीत हा उपक्रम सुरू करण्यास इतका विलंब होत आहे. तर, शहरातील सर्व 95 झोपडपट्ट्यांत कशा प्रकारे अंमलबजावणी करणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

झोपडपट्ट्यांचा कचरा मोशी डेपोत जाणार नाही
टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व झोपडपट्ट्यांत झिरो वेस्ट उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यात तयार होणार कचरा तेथेच जिरवला जाईल. झोपडपट्टी जवळच्या जागेतील केंद्रात सुक्या कचर्याचा पुनर्वापर करण्यात येतो. तर, ओल्या कचर्यापासून खत तयार केले जाते. त्यामुळे सर्व झोपडपट्ट्या कचरामुक्त होणार आहेत. झोपडपट्टीतच कचर्याची विल्हेवाट लागणार असल्याने मोशी कचरा डेपोत येथील कचरा टाकणे बंद होणार आहे. त्यामुळे डेपोवरील कचर्याचा ताण कमी
होणार आहे.

सर्व झोपडपट्ट्यांऐवजी केवळ आठ ठिकाणी उपक्रम
शहरात 95 झोपडपटट्या असल्याची नोंद आहे. त्या सर्व झोपडपट्टीत झिरो वेस्ट उपक्रम सुरू करण्याची घोषणा तत्कालीन आयुक्त राजेश पाटील तसेच, उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केली होती. मात्र, दोनदा जाहीर केलेले मुहूर्त हुकले तरी, अद्याप एकापेक्षा अधिक झोपडपट्टीत हा उपक्रम सुरू झालेला नाही. एकाच वेळी सर्व झोपडपट्ट्यांत उपक्रम सुरू न करता क्षेत्रीय कार्यालयानिहाय एका झोपडपट्टीत उपक्रम सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

Back to top button