Asian Games : भारताची 100 पदके निश्चित! सोनम मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकले | पुढारी

Asian Games : भारताची 100 पदके निश्चित! सोनम मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज (6 ऑक्टोबर) 13 वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, आठव्या दिवशी 15 नवव्या दिवशी सात, दहाव्या दिवशी नऊ आणि 11व्या दिवशी 12, तर 12 व्या दिवशी पाच पदके मिळाली आहेत. सध्या भारताच्या खात्यात एकूण 91 पदके जमा झाली आहेत. यात 21 सुवर्ण, 33 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे.

महिला कुस्तीत कांस्यपदक

कुस्तीमध्ये सोनम मलिकने महिलांच्या 62 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. तिने चीनच्या लाँग जियाला 7 विरुद्ध 5 गुण फरकाने मात देऊन पदकाला गवसणी घातली. 0-3 ने पिछाडीवर पडल्यानंतर चीनच्या कुस्तीपटूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र सोनम मलिकने वर्चस्व राखले. चीनच्या प्रशिक्षकाने शेवटच्या संधीचा रेफरल घेतला जो चुकीचा ठरला. याचबरोबर सोनम कांस्य जिंकण्यात यशस्वी झाली. महिला किस्तीमधील हे दुसरे पदक आहे. काल (दि. 5 ऑक्टोबर) अंतिम पंघालने पहिले पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा 2023 मधील भारताचे हे 91 वे पदक आहे. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची 100 पदके निश्चित झाली आहेत. नऊ भारतीय खेळाडूंनी विविध खेळांमध्ये आपली पदके निश्चित केली आहेत.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने केला पाकिस्तानचा पराभव

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडणार आहे. अफगाण संघानेही किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने सहा गडी गमावून 116 धावा केल्या आणि सामना जिंकला.

भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहचला

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. याचबरोबर टीम इंडियाने अंतिम फेरी प्रवेश केला असून आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांची पहिली विकेट 18 धावांवर पडली. यानंतर बांगलादेश नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि 96 धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद 24 धावा केल्या. परवेझ हुसेनने 23 धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय फक्त रकीबुल हसन (14 धावा) दुहेरी आकडा पार करू शकला. बांगलादेशचे सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवी साई किशोरने तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बाद झाली. मात्र, त्यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी स्फोटक फलंदाजी केली. या जोडीने बांगलादेशची गोलंदाजी अक्षरश: फोडून काढली आणि प्रति षटकात 10 पेक्षा जास्त धावा वसूल केल्या. त्यांनी चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या 50 धावांपर्यंत पोहोचली. तिलकने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले. भारताने 9.2 षटकात एक विकेट गमावून 97 धावा केल्या आणि सामना जिंकला. टिळक वर्मा 26 चेंडूत 55 धावा आणि ऋतुराज गायकवाड 26 चेंडूत 40 धावा करून नाबाद राहिले. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.

तिरंदाजी भारतीय संघाला रौप्य

भारतीय पुरुष रिकर्व्ह तिरंदाजी संघाने रौप्य पदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात अतानु, तुषार आणि धीरज या भारतीय तिकडीचा दक्षिण कोरियाने पराभव केला. यासह भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

प्रणॉयने जिंकले कांस्यपदक

एचएस प्रणॉयला उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागणार आहे. चीनच्या लीने त्याचा 21-16, 21-9 असा सलग गेममध्ये पराभव केला. मात्र, या पराभवानंतरही तो कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. 1982 मध्ये सय्यद मोदींनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा प्रणॉय हा पहिला भारतीय आहे. या खेळात भारताला तब्बल 41 वर्षांनंतर पदक मिळाले आहे.


कबड्डीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले

भारतीय कबड्डी संघाने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा 61-14 अशा फरकाने एकतर्फी पराभव केला. यासह भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून किमान रौप्य पदक निश्चित आहे.

सेपकटकराव : भारतीय महिला रेगु संघाने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले

माईपाक देवी आयेकपम यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला रेगु संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडविरुद्ध 0-2 असा पराभूत झाला. याचबरोबर भारतीय महिला संघाला सेपक टकरावमध्ये कांस्यपदक मिळाले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला थायलंडविरुद्ध 21-10, 21-13 असा पराभव स्वीकारावा लागला.

Back to top button