

पिंपरी : अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री झाल्याची घोषणा बुधवारी (दि. 4) झाली अन् एका दिवसात पिंपरी-चिंचवडच्या राजकारणाची दिशाच बदलली. महायुतीचा धर्म म्हणून सहन होईना अन् सांगताही येईना… अशी अवस्था मित्रपक्षाची झाली असून, पिंपरी-चिंचवडचा राजकीय पालक कोण, अशी चर्चा राजकीय गोटात रंगली.
संबंधित वाचा :
अजित पवार यांनी जातीने शहराच्या राजकारणात आणि विकासात लक्ष घातले होते. शहराची त्यांना खडान्खडा माहिती आहे. त्यामुळेच महापालिकेतील गतवेळचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांच्या पराभवानेही ते व्यथित झाले होते. मात्र, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारात उतरावे लागले होते. आता पालकमंत्रीपद मिळाल्याने ते पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करतील.
गतवेळीच दिले होते संकेत
राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पवारांनी महापालिकेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. यापुढेही महापालिकेच्या कारभारात जातीने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी पालकमंत्री स्टाईल कारभार सुरू केला होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
त्रिफळीचा फायदा कुणाला?
अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असा पदाधिकार्यांना विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांतील जागा वाटपाचा तिढा आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जनमताचा कौल कुणाला मिळणार, यावरही राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
विधानसभा अन् लोकसभेवरही प्रभाव
पवारांच्या पालकमंत्री होण्याने शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाच्या आगामी राजकीय गणितांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात गतवेळी पार्थ पवार यांनी निवडणूक लढविली होती. या वेळी याठिकाणी पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
मित्रपक्षांसमोर आव्हान
विकासकामांची उद्घाटने अथवा अन्य कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याखेरीच भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अद्याप स्थानिक राजकारणात लक्ष घातलेले नाही. या उलट अजित पवारांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने थेट शहराच्या राजकारणात लक्ष घातल्याने मित्रपक्ष भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
महापालिकेत भाजप सत्तेत होता. भाजपने शहराध्यक्षपदाची सूत्रे नुकतीच शंकर जगताप यांच्याकडे दिली आहेत. पक्ष एकसंध ठेवण्याचे आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेमध्ये पक्षाचा दबदबा कायम ठेवण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
याउलट राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकार्यांना चांगलेच बळ मिळाले आहे.
आम्ही विकासाचे राजकारण करीत आहोत. मित्रपक्ष म्हणून आम्ही बरोबरच आहोत. महापालिकेत शंभरचा नारा आम्ही दिला होता. अजित पवार यांच्यामुळे आम्हांला निश्चितच 125 हून अधिक जागा मिळतील. जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, (भाजप)या घडामोडीचा महायुतीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीचा फटका युतीला बसणार आहे आणि आमचे नेते शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्हांला यश मिळेल, याची खात्री आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट)अजित पवार पालकमंत्री झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती येईल. त्यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचे व्हिजन आहे. येथील प्रश्न त्यांना माहिती आहेत. त्यामुळे हे प्रश्न मार्गी लागतील आणि चुकीच्या कामांना आळा बसून विकासाची कामे होतील.
– अजित गव्हाणे, (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, अजित पवार गट)