केळीला मिळतोय प्रतिकिलोस उच्चांकी दर

केळीला मिळतोय प्रतिकिलोस उच्चांकी दर

बावडा : बावडा येथील प्रगतशील शेतकरी संतोष मधुकरराव पाटील यांच्या केळीला प्रतिकिलोस 30.30 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे सध्या केळी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये उत्साह व समाधानाचे वातावरण आहे. सध्या संतोष पाटील यांच्या केळीची इराण, सौदी अरेबिया या देशांमध्ये निर्यात चालू आहे. संतोष पाटील यांची एकूण 2 एकर क्षेत्रावर केळीची बाग असून, सोमवारी (दि. 2) त्यांच्या 10 टन केळींची इराणला निर्यात झाली. त्या केळीस प्रतिकिलो 30 रुपये 30 पैसे उच्चांकी भाव मिळाला. त्यांच्या केळी पिकाची आणखी महिनाभर काढणी चालणार असून, त्यांना सुमारे 70 टन एवढे उत्पादन मिळेल, असे संतोष पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

आधुनिक पद्धतीने संतोष पाटील यांनी केळीचे पीक घेतले असून, नोव्हेंबर 2022 मध्ये केळीची बेड पद्धतीने त्यांनी लागवड केली. त्यासाठी त्यांनी ठिबकच्या दुहेरी ओळीचा वापर केला. तसेच वेळोवेळी औषध, खत व्यवस्थापन काटेकोरपणे केले. याकामी त्यांचा मुलगा जयदत्त पाटील तसेच जयकुमार शिंदे, तुषार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

बागेतूनच होते विदेशात निर्यात
बागेतच काढणीनंतर केळी घड स्वच्छ करून ते बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग केले जातात. त्यानंतर कुलिंग व्हॅनमधून इराण, सौदी अरेबिया या देशांत निर्यात केली जाते. शेतकर्‍यांनी निर्यातक्षम केळीचे उत्पादन घ्यावे, असे आवाहनदेखील संतोष पाटील यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news