Pimpri Crime News : गेट उघडण्यास उशीर झाल्याने सुरक्षारक्षकावर खुनी हल्ला

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेट उघडण्यास उशीर झाल्याने दोघांनी मिळून सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. तसेच, लाकडी दांडक्याने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेनऊच्या सुमारास खराबवाडी येथील बंद पडलेल्या फोर्जीक कंपनीच्या गेटवर घडली. ओमकार जयराम शिंदे (23, रा. चाकण), आर्यन दशरथ चव्हाण (19, रा. चाकण) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हनुमंत रंगनाथ आबुज (55, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल पानझाडे (35) असे जखमी सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथे बंद पडलेल्या फोर्जीक कंपनीच्या गेटवर अमोल हे सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. दरम्यान, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गेटवर आले. त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. मात्र, अमोल जेवण करीत असल्यामुळे त्यांना गेट उघडण्यास उशीर लागला. त्यावरून आरोपींनी अमोल यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांडक्याने मारून अमोल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा
कंटेनरनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 2) सकाळी साडेसातच्या सुमारास कुरुळी स्पायसर चौक येथे हा अपघात घडला. स्वप्नील जाधव, असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी भरत सुदाम बिरदवडे (48, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बंटी धारा सिंग (32, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंटी याने त्याच्या ताब्यातील कंटेनरने स्वप्नील जाधव यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे स्वप्नील रत्यावर पडले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्वप्नील यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा
नाशिक : प्रेस कामगारांची दिवाळी होणार गोड, यंदा सोळा हजार बोनस
Pimpri News : दापोडी पोलिस ठाणे थांबवणार तक्रारदारांची पायपीट