फ्लेमिंगोंचा मुक्काम तब्बल अडीच महिन्यांनी लांबला | पुढारी

फ्लेमिंगोंचा मुक्काम तब्बल अडीच महिन्यांनी लांबला

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : यंदा पावसाने कमालीची ओढ दिल्याने उजनी धरण जवळपास पन्नास टक्के भरले आहे. उजनीतील पाणीसाठा कमी असल्याने यंदा अग्निपंखांचा मुक्काम तब्बल अडीच महिन्यांनी लांबला आहे. अग्निपंखांच्या या कवायती पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. पक्ष्यांचे माहेरघर म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. चित्रबलाक, ग्रे हेरॉन, ब—ाह्मणी बदके, राजहंस, रोहित, करकोचे अशा शेकडो रंगबिरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटाने उजनीचा काठ फुलून गेलेला असतो. जगाच्या कानाकोपर्‍यातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी दरवर्षी फेब—ुवारी ते जुलै-ऑगस्ट या काळात उजनीतीरावर मुक्कामी असतात. जोरदार पाऊस सुरू झाल्यानंतर उजनी धरणातील पाणीपातळी वाढत जाते. सप्टेंबरअखेरीस धरण भरते. या कालावधीत पक्षी माघारी फिरतात. यामध्ये लक्षवेधी अशा रोहित पक्ष्यांचाही समावेश असतो.

संबंधित बातम्या :

यंदा मात्र ऑक्टोबर सुरू झाला, तरी या पक्ष्यांचा मुक्काम उजनीवरच आहे. कारण, अत्यल्प पावसामुळे उजनी भरू शकलेले नाही. सध्या जलाशयात क्षमतेच्या निम्माच पाणीसाठा आहे. धरणाचे पात्र उघडे पडल्याने पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर खाद्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे या पक्ष्यांनी अद्यापही आपला मुक्काम उजनीवरच ठेवलेला आहे. त्यामुळे पर्यटक तसेच पक्षिअभ्यासकांचा ओढा उजनीकडे वळलेला आहे. याबाबत कुंभारगावच्या सरपंच उज्ज्वला परदेशी म्हणाल्या की, एका बाजूने उजनीत अपेक्षित पाणीसाठा नसल्याने शेतकरी व मच्छीमार अडचणीत आले आहेत, तर दुसर्‍या बाजूने पाणी कमी असल्याने पक्ष्यांना दिलासा मिळाला आहे. रोहित पक्ष्यांचा वाढलेला मुक्काम पर्यटन व्यावसायिकांच्या पथ्यावर पडणारा आहे.

Back to top button