राज्यातील 2 लाख शिक्षक रस्त्यावर उतरणार; शिक्षक संघाचा सोमवारी आक्रोश मोर्चा | पुढारी

राज्यातील 2 लाख शिक्षक रस्त्यावर उतरणार; शिक्षक संघाचा सोमवारी आक्रोश मोर्चा

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्यभरातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. अशैक्षणिक ऑनलाइन कामे, खासगीकरण, कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा शासनाच्या धोरणामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आम्हाला शिकवू द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने 2 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील दोन लाख शिक्षक यानिमित्त रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.

सध्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळत नसल्याने सरकारी शाळा धोक्यात आल्या आहेत. विविध प्रकारची माहिती शिक्षकांकडून मागविली जात आहे. राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, डायट, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरून शिक्षकांना कागदी घोडे नाचवण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षक त्रस्त असल्याचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे म्हणाले.

समूह शाळेला विरोध

वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समूह शाळा सुरू करण्याची शासनाची योजना चुकीची आहे, असे शिक्षक संघाचे म्हणणे आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू असून, प्रशिक्षण व ऑनलाइन माहितीस शिक्षकांचा विरोध आहे. फंड प्रस्ताव व वैद्यकीय बिलांसाठी लागणारा विलंब तसेच पुरवणी
बिलांसाठी वेळेवर तरतूद होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

ऑनलाइन माहितीचा अतिरेक

शालार्थ, स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, यु-डायस पोर्टल, बदली पोर्टल, दीक्षा अ‍ॅप, एमडीएम अ‍ॅप, विनोबा अ‍ॅप, उल्हास अ‍ॅप, प्रशिक्षणे लिंक यांसारखी दररोज वेगवेगळी ऑनलाइन माहिती मागवली जाते. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे.

खासगीकरणाला विरोध

सरकारी शाळांमध्ये सीएसआरच्या नावाखाली खासगीकरण होत असल्याची शिक्षकांचा आरोप आहे. सरकारी शाळांना भांडवलदारांची नावे देण्याचा शासन निर्णय त्वरित माघारी घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.

शिक्षण विभागामध्ये शिक्षक प्रतिनिधींची भूमिका ऐकून घेण्यासाठी कोणीही तयार नाही. संवादाचा अभाव असल्याने 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेसमोर आक्रोश आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

– बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ,

हेही वाचा

सिंधुदुर्ग : तिलारी आंतरराज्‍य धरण प्रकल्‍पातील पाणी साठ्यात वाढ

सौदी अरेबियातील वाळवंटात उंटांच्या उत्थितशिल्पांचा शोध

Pune PMPML News : आता पीएमपी, मेट्रो तिकीट यंत्रणा कनेक्ट करा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Back to top button