रियाध : पुरातत्त्व संशोधकांनी सौदी अरेबियातील वाळवंटात मोठ्या शिळांवर कोरलेल्या उंटांच्या भव्य अशा उत्थितशिल्पांचा शोध लावला आहे. या शिल्पांमधील उंट जंगली असून ही प्रजाती आता नामशेष झाली आहे. एकेकाळी अरेबियन पेनिन्सुलामधील वाळवंटात असे उंट वावरत होते. सौदी अरेबियाच्या नाफद वाळवंटात त्यांचे हे उत्थितशिल्प आढळले आहे.
या शिल्पांमध्ये डझनभर उंट कोरलेले दिसत असून त्यांचा आकार खर्या उंटांइतकाच आहे. या जंगली उंटांना कधीही वैज्ञानिक नाव मिळाले नाही. 'आर्कियोलॉजिकल रिसर्च इन एशिया' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. वाळवंटातील साहौत याठिकाणी या शिल्पकृती आढळून आल्या. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ जियोअँथ—ोपोलॉजीमधील संशोधिका मारिया गुआगनिन यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, शिल्पकृतींचे हे ठिकाण शोधून काढणे ही अतिशय कठीण गोष्ट होती. हे सहजपणे जाण्यासारखे ठिकाण नव्हते. या शिल्पकृतींवर वेगवेगळ्या काळात काही नवी पुटंही चढवली असल्याने हे कोरीव काम सहज ओळखण्यासारखेही नव्हते.
वेगवेगळ्या टप्प्यात व वेगवेगळ्या काळात या कलाकृतींवर हात फिरवण्यात आलेला आहे. रेडिओकार्बन डेटिंगनुसार साहौत हे ठिकाण दोन काळांमध्ये मानवाच्या ताब्यात होते असे दिसून आले. त्यापैकी पहिला कालखंड 'प्लिस्टोसीन' (2.6 दशलक्ष ते 11,700 दशलक्ष वर्षांपूर्वीचा) आणि दुसरा कालखंड 'मिडल होलोसीन'चा (7000 ते 5000 वर्षांपूर्वीचा) आहे. अतिशय सुंदररित्या या उंटांच्या कलाकृती बनलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक उंटांच्या फरपासून ते अन्य शारीरिक वैशिष्ट्यांचा बारकाईने तपशील पाहायला मिळतो. विशेष म्हणजे यापैकी बहुतांश उंट हे नर आहेत. याठिकाणी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे हे ठिकाण कदाचित लोकांच्या प्रवासातील एखाद्या थांब्यासारखेच असावे असे दिसते.