

वाघोली(पुणे); पुढारी वृत्तसेवा : लोणीकंद-केसनंद (तालुका हवेली) रस्त्यावर मगर वस्ती तेथे पहाटे दोनच्या सुमारास भारत गॅस कंपनीचा गॅस घेऊन जाणार टँकर पलटी झाला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोणीकंद पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली आहे. टँकर मधून गॅस लिकीज होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लोणीकंद पोलिसांच्यावतीने केसनंद-लोणीकंद रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. इमर्जन्सी रेस्क्यू व्हॅनच्या साहाय्याने भारत गॅस कंपनीचा दुसरा टँकर बोलावून त्यामध्ये गॅस शिफ्ट करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. सदर रोडवरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली. त्यासाठी दहा चेक पॉईंट्स / पंक्चर पॉईंट्स वर अंमलदार नेमण्यात आले होते. रात्रीच अग्निशमन दल व भारत गॅसचे सेफटी मॅनेजर यांना घटनास्थळी बोलावले. घटनास्थळावरून उच्चदाबाच्या विद्युतवाहक तारा जात असल्याने वीज वितरण विभागाशी संपर्क करून विद्युत प्रवाह बंद केला. सदर भागात घरे असणाऱ्या लोकांना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गॅस दुसऱ्या टॅंकरमध्ये भरण्यात आला. हे रेस्क्यू आॅपरेशन ४-५ तास चालले होते. लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे इतर पोलीस सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आसपास जोडणारे रस्ते सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत बंद करण्यात आले. त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला, लोणीकंद पोलिसांच्या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
हेही वाचा