जगातील पहिले शिवरायांचे सोन्याचे मंदिर शिवजन्मभूमीत उभारणार; माजी आमदार शरद सोनवणे यांची घोषणा | पुढारी

जगातील पहिले शिवरायांचे सोन्याचे मंदिर शिवजन्मभूमीत उभारणार; माजी आमदार शरद सोनवणे यांची घोषणा

ओझर(पुणे);  पुढारी वृत्तसेवा : छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवजन्मभूमीत (ता.जुन्नर) जगातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याचे मंदिर उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गोद्रे (ता.जुन्नर) गावातील 25 एकर जागा मंदिरासाठी निश्चित करण्यात आली आहे. माजी आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यात 29 तारखेला सर्वांत मोठी घोषणा होणार असल्याचे होर्डिंग लावले होते. त्यामुळे सर्वात मोठी कोणती घोषणा होणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागले होते.

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सुवर्ण मंदिर निर्माण करताना प्राचीन पद्धतीचे भव्यदिव्य महाद्वार व तटबंदी बांधण्यात येणार आहे. महाराजांच्या जीवनावर आधारित सुसज्ज ग्रंथालय, शिवभक्तांसाठी भोजनालय, छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनावर आधारित चित्रफीत, लघुपट सभा मंडप, संग्रहालय, लेझर वॉटर शोसाठी अ‍ॅम्पी थिएटर, छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचे सोन्याचा मुलामा असलेले मंदिर व महाराजांची सुवर्णमूर्ती यासह अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

मंदिराची वैशिष्ट्ये

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची उभारणी अंदाजे एक लाख चौरस मीटरमध्ये करण्यात येणार आहे. मंदिराचे वातावरण अनुकूलित ठेवण्यासाठी भारतीय प्रजातीचे वृक्षरचना व उद्यानाचे सुशोभीकरण, सिंहासनधारी सुवर्ण मंदिर ते महाद्वारापर्यंत जिवंत पाण्याचा प्रवाह, पाण्याच्या कारंज्यांसोबत मंदिराच्या मुख्य द्वारावर धावते अश्व पुतळे, मंदिर परिसराला भव्य तटबंदी, सुवर्ण मंदिर व महाराजांच्या पुतळ्याचे प्रेक्षणीय अवलोकन करण्याकरिता दालन, जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज व भारतीय मूर्तिकार जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. पवार हे मूर्र्तीची निर्मिती करणार आहे.

छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या सुवर्ण मंदिराची निर्मिती करण्यासाठी श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माजी आमदार शरद सोनवणे काम पाहणार असून, ट्रस्टवर अठरापगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. सुवर्ण मंदिराची निर्मिती राजकारणविरहित असून, सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे.

जुन्नर तालुक्यातील विविध विकासकामांच्या निर्मतिीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले. या वेळी माजी जि.प. सदस्य गुलाब पारखे, नेताजी डोके, मंगलदास बांदल, सचिन वाळुंज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

जागतिक स्पर्धेत नंदुरबारचे नाव झळकवणाऱ्या नारायणीची पालकमंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर : ओबीसी आंदोलनाची २२ दिवसांनतर आज सांगता

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पिकअपने घेतला पेट..!

Back to top button