Sharad Pawar News : पवारांच्या दौर्‍याने जुन्नरला चौथा उमेदवार मिळणार ! | पुढारी

Sharad Pawar News : पवारांच्या दौर्‍याने जुन्नरला चौथा उमेदवार मिळणार !

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून पक्षाचे नेते शरद पवार जुन्नर-आंबेगाव तालुक्यात सभा घेणार असल्याची चर्चा होती. अखेर तो दिवस उजाडला असून, येत्या 1 ऑक्टोबर रोजी आदिवासी चौथरा अभिवादनानिमित्त जुन्नर तालुक्यात मेळावा घेणार आहेत. शरद पवार यांच्या या मेळाव्यानंतर जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. या दौर्‍यात पवार काँग्रेस नेते व विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या घरी पाहुणचार घेणार आहेत. सत्यशील शेरकर हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुक्यातील आमदारकीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवार यांच्या जवळचे अनेक लोक सोडून गेले. पवारांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटीलदेखील सोडून गेल्याने पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवारांनी आपल्याला सोडून गेलेल्या सर्वांना धडा शिकवण्यासाठी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. सर्वात पहिली सभा आंबेगाव तालुक्यात घेणार होते, परंतु ही केवळ घोषणाच राहिली. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ भूमिका घेत शरद पवार की, अजित पवार असे कोणा एकाकडे न जाता दोन्ही व्यासपीठावर जाण्याचा निर्णय घेतल्याने 1 ऑक्टोबरला ते शरद पवार यांचे स्वागत करणार आहेत. …जुन्नरला चौथा उमेदवार मिळणार
(पान 1 वरून) असे असले तरी राज्यातील बहुतेक सर्व तरुण आमदार अजित पवार समर्थक असल्याचे शरद पवार यांना पक्के माहीत आहे. आमदार अतुल बेनके यांचे वडील माजी आमदार वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक; परंतु दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे वल्लभ बेनके यांना नेहमीच दुय्यम पदावर समाधान मानावे लागले. सलग तीन वेळा निवडून येऊन वरिष्ठ असूनही शरद पवारांनी बेनके यांना कधीही मंत्रिपद दिले नाही. आतादेखील आपल्या नेहमीच्या राजकीय खेळीप्रमाणे पवार आपल्या पक्षाचे आमदार सोडून काँग्रेसचे सत्यशील शेरकर यांच्या घरी पाहुणचार घेणार आहेत. पवार यांना सध्या जुन्नर तालुक्यात हक्काचा उमेदवार नाही.

शेरकर यांच्या रूपाने तरुण व तालुक्याला परिचित चेहरा शरद पवार यांना मिळू शकतो. शेरकर यांचीदेखील सुप्त इच्छा यानिमित्त पूर्ण होऊ शकते. सध्या जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके, भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आणि माजी आमदार व सध्या शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत असलेले शरद सोनवणे आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. आता पवार यांच्या दौ-यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्यशील शेरकर नवे व चौथे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येऊ शकतात.

शेरकर कारखान्याचा विचार करणार

सत्यशील शेरकर सध्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने ते विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास कदाचित मोठी लढत देऊ शकतात; परंतु शेरकरांच्या या निर्णयाने कारखान्याचे सर्वपक्षीय राजकारण अडचणीत सापडू शकते. यामुळे शरद पवार यांच्या दौर्‍यानंतर सत्यशील शेरकर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान नव्‍हते : कर्नाटक भाजप आमदारांच्‍या विधानाने नवा वाद

Pune Crime news : अवैध मद्यासह कार जप्त; एकजण ताब्यात

खलिस्तानी, गँगस्टरविरोधात एनआयएची सहा राज्यांत छापेमारी

Back to top button