बाप्पा पावले..! पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी 21 नवी वाहने | पुढारी

बाप्पा पावले..! पिंपरी-चिंचवड पोलिसांसाठी 21 नवी वाहने

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात महिंद्रा कंपनीची 21 नवी कोरी चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. शासनाकडून ही वाहने देण्यात आली आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहने दाखल झाल्याने बाप्पा पावल्याच्या प्रतिक्रिया पोलिस वर्तुळात उमटत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात अठरा पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन ते तीन पोलिस चौक्या आहेत. प्रत्येक चौकीअंतर्गत बिट मार्शलीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना गस्तीसाठी दुचाकी देण्यात आली आहे. तसेच, पोलिस अधिकार्‍यांना गस्तीसाठी चारचाकी वाहने देण्यात आली आहेत. पोलिस आयुक्तालयात एकूण 140 चारचाकी (लाईट व्हॅन, कार, बस), 183 दुचाकी, अशी एकूण 323 वाहने आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारा परिसर आणि लोकसंख्याच्या तुलनेत ही वाहने कमी पडत होती. परिणामी पोलिसांच्या गस्तीवरदेखील मर्यादा येत होत्या. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शासनाकडे वाहनांची मागणी केली होती. मागील कित्येक महिन्यांपासून ही मागणी प्रलंबित होती. दरम्यान, मंगळवारी (दि. 26) मागणीनुसार महिंद्रा कंपनीची 21 वाहने शहरात दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक चारचाकी

शहरात दाखल झालेल्या 21 नव्या वाहनांपैकी प्रत्येकी एक वाहन पोलिस ठाण्यासाठी देण्यात येणार आहे. ज्यामुळे स्थानिक पोलिसांना आणखी प्रभावीपणे गस्त तसेच इतर कामकाज करता येणार आहे.

हेही वाचा

Nagar Ganeshotsav 2023 : ‘ठाकरे’मागे शिवसेना शिंदे; जिल्हा प्रशासनातर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीतील क्रमवारी

राहाता : पाहुणे म्हणून येता, पाहुण्यांसारखे राहा; मंत्री विखे पाटलांचा आ. थोरातांना खोचक सल्ला

Mahadev Jankar : रासप सर्व निवडणुका लढणार : महादेव जानकर

Back to top button