Anant Chaturdashi 2023 : बाप्पाची निरोपाची सवारी…सजली अवघी नगरी सारी…

Anant Chaturdashi 2023 : बाप्पाची निरोपाची सवारी…सजली अवघी नगरी सारी…

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमन दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदीकिनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

तसेच जीवरक्षकांच्या यंत्रणा, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांची गळतीच्या ठिकाणी त्वरित दुरुस्ती कामे करण्यासाठी स्वतंत्र कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपणाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सूचना फलक आदी तयारी करण्यात आली आहे.

महापालिकेकडून होणार स्वागत

महापालिकेच्या वतीने टिळक चौकासह (अलका टॉकीज) साहित्य परिषद-टिळक रस्ता, माती गणपती-नारायण पेठ असा तीन ठिकाणी गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात येणार आहेत.

255 ठिकाणी करा निर्माल्य संकलन

महापालिकेकडून शहरातील 255 ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 53 ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले जाणार आहेत. तर विविध ठिकाणी 153 ठिकाणी लोखंडी कंटेनरची व्यवस्था केली आहे. कंटेनर भरल्यानंतर ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी साधा संपर्क

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापनाही केली आहे. या विभागाचे 020-25501269, 25506800, 25506801, 25500802 हे दूरध्वनी क्रमांक असून, त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाचे 128 जीवरक्षक

दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागाने मुठा नदीकाठच्या विसर्जन घाटांवर 17 फायरमन सेवक व 111 जीवरक्षक तैनात केले आहेत, तसेच प्रत्येक दोन घाटांवर 1 अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. या कर्मचार्‍याकडे लाइफ जॅकेट, लाइफ बॉय असे साहित्य असणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गरवारे, संभाजी पूल, लकडी पूल यांना नेकलेस जाळी लावण्यात आली आहे. याशिवाय जागोजागी नदीपात्रात आडवे दोरही बांधले आहेत.

सकाळी दहा वाजता होणार मिरवणुकीस प्रारंभ

गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यास व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे.

चार फिरते दवाखाने पोहोचणार रुग्णांपर्यंत…

महापालिकेतर्फे विसर्जन मिरवणुकीमध्ये बेलबाग चौक, महाराणा प्रताप उद्यान, रमणबाग चौक, टिळक चौक या ठिकाणी 4 फिरते दवाखाने असणार आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, मदतनीस वैद्यकीय सेवेसाठी सज्ज असणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात लाखो नागरिक उपस्थित असतात. केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता या सर्व प्रमुख रस्त्यांवर गर्दी होते. काहींना वैद्यकीय गरज पडते. त्यासाठी वैद्यकीय पथके सज्ज ठेवली आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे तीन स्वयंसेवी संस्थांना औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वयंसेवी संस्थांतर्फे सर्व प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये प्रथमोपचार आणि औषधोपचार दिले जातील. त्याचप्रमाणे, डॉक्टरांची टीमही कार्यरत असणार आहे.

या घाटांवर करा विसर्जन

संगम घाट
वृद्धेश्वर घाट/सिद्धेश्वर घाट
अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)
बापूघाट (नारायण पेठ)
विठ्ठल मंदिर (अलका चौक)
राजाराम पूल घाट
ठोसरपागा घाट
चिमा उद्यान, येरवडा
वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. 1 नदीकिनारा
नेने/आपटे घाट
ओंकारेश्वर
पुलाची वाडी/नटराज सिनेमामागे
खंडोजी बाबा चौक
गरवारे कॉलेजची मागील बाजू
दत्तवाडी घाट
औंधगाव घाट
बंडगार्डन घाट
पांचाळेश्वर घाट.

मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी 10 वाजता होणार.
विसर्जनासाठी 42 बांधीव हौद.
विसर्जनासाठी 150 फिरते हौद.
शहरात 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या.
शहरात 1183 स्वच्छतागृहे.
400 फिरती स्वच्छतागृह
252 मूर्तिसंकलन व मूर्तिदान केंद्रे.
256 ठिकाणी निर्माल्य कलश.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news