Eid-e-Milad-un-Nabi | मानवी ऐक्याचे प्रवर्तक : मोहम्मद पैगंबर | पुढारी

Eid-e-Milad-un-Nabi | मानवी ऐक्याचे प्रवर्तक : मोहम्मद पैगंबर

- शफीक देसाई

मोहम्मद (स.) पैगंबर तासन्तास हिरा डोंगराच्या गुफेमध्ये चिंतनात घालवत. सामाजिक दुःख आणि वेदनेने त्यांचे हृदय कळवळून गेले होते. समाज अतिशय अवनत अवस्थेस पोहोचला होता. स्वार्थ, हव्यास व तृष्णेने बरबटलेला बुभुक्षित समाज पशुवत रानटी अवस्थेला पोहोचला होता. वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या आश्रयाने राहणारे लोक म्हणजे एक प्रकारे जंगली पशूंचे कळपच होते. एक मानवी समाज म्हणून किमान सामाजिक मूल्यांची कसोटी पूर्ण करणे अवघड होते. (Eid-e-Milad-un-Nabi)

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रात त्यावेळी अनागोंदी आणि अराजक माजले होते. समाजामध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत, मालक-नोकर अशा अनेक भेदभावांच्या भिंती उभ्या होत्या. वेठबिगारी, गुलामगिरी, स्त्री दास्य अशा अघोरी प्रथा समाजात राजरोस होत्या. अंधश्रद्धा, वाईट चाली, रिती, रिवाज यांचा बोलबाला होता. जुगार, सावकारी, लुटालूट, शोषण हाच आर्थिक व्यवहार होता. प्रत्येक समूहाच्या वेगवेगळ्या देव देवता व त्यावर आधारित प्रथा, परंपरा होत्या. माणसातील व समाजातील प्रेम, सौहार्द, सद्भाव, बंधुभाव, चांगुलपणा व सद्व्यवहार हरवून बसला होता.

पैगंबरांच्या सामाजिक चिंतनाचा परिपाक दिव्यज्ञानाच्या रूपाने प्रकट झाला. अनेक गोष्टींचे आकलन झाले. अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली. त्यांच्या जीवितकार्याचे ध्येय आणि उद्देश सापडले. अतिशय अवनत अवस्थेत पोहोचलेल्या व्यक्ती, समाज व समष्टीला उच्च, उन्नत आणि सन्मानित अवस्थेला नेणे हेच महान कार्य त्यांनी हाती घेतले. सत्य, न्याय, नैतिकतेसह माणसाचा सन्मान, सामाजिक सौहार्द, शांती, समता, बंधुभाव आणि विशेष म्हणजे मानवी ऐक्य व एकात्मता रुजवून मानवतेची प्रतिष्ठापना करण्याचे दिव्यकार्य त्यांच्या हातून घडले.
समाजात अनेक कारणांनी भेदभाव आणि द्वैत निर्माण झाले होते. माणसांची मने आणि समाज दुभंगलेला होता. ही मने आणि समाज जोडण्याचे महत्त्वाचे कार्य होते. त्यांच्यामध्ये ऐक्य आणि एकात्मता घडवून आणणे जरुरीचे होते. पैगंबरांनी अनेक वाईट प्रथांचा गाशा गुंडाळला आणि एकच एक परमेश्वराचा जयघोष केला. कुराणमध्ये या गोष्टीचा स्पष्ट आणि साध्या, सोप्या शब्दांत उल्लेख केलेला आहे. (Eid-e-Milad-un-Nabi)

विश्वाच्या या अफाट निर्मिती व कार्यकारणास एकच एक परमशक्ती कारणीभूत आहे. मग, तुम्ही त्याला निर्माता म्हणा, सर्जक म्हणा किंवा परमेश्वर म्हणा! तो एकमेवाद्वितीय आहे. परमेश्वराच्या एकत्वाविषयी कुराण म्हणते, ‘एका परमेश्वराशिवाय त्याचा अन्य कोणी भागीदार नाही. नाहीतर प्रत्येक परमेश्वर वेगळी सृष्टी आणि विश्व निर्माण करता आणि ते एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते. अशा गोष्टींपासून परमेश्वर पवित्र होय.’ कुराण (23:91). परमेश्वराच्या ऐक्य आणि एकत्वातून मानव जातीचे ऐक्य आणि एकात्मता साधने हे इस्लामचे पायाभूत ध्येय व कार्य आहे. त्यामुळे एकच एक परमेश्वराचे अस्तित्व न मानणे (कुफ्र) व त्याचा कोणीतरी अन्य भागीदार करणे (शिर्क) या गोष्टी इस्लामच्या पायाभूत तत्त्वज्ञानाला धक्का पोहोचवतात. मानवी ऐक्य व एकात्मता समाज जीवनातील अनेक द्वैत व दुभंगलेपणावर प्रभावी साधन व जीवनमूल्य आहे. म्हणून इस्लाममध्ये एक परमेश्वरासह मानवी ऐक्य, ऐकता व एकात्मतेचा गौरव केलेला आहे.

आजची सामाजिक परिस्थिती विदारक आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये द्वैत आणि दुभंगलेपण आपणास निदर्शनास येते. धर्माधर्मांत, जातीजातीत विद्वेष, घृणा, भेदभाव व त्यातून पुढे अन्याय, अत्याचार व हिंसेस कारणीभूत होत आहे. वैचारिक विखार जाणीवपूर्वक पसरवला जात आहे. राजकीय स्वार्थासाठी माणसांमध्ये भेदाभेदाची विषवल्ली रुजवली जात आहे. माणूस माणसापासून तोडला जात आहे. उदार व विशाल धर्माचे स्वरूप संकिर्ण व संकुचित केले जात आहे. अशावेळी माणसामाणसात व समाजात प्रेम, सौहार्द, बंधुभाव आणि विशेष म्हणजे मानवी ऐक्य, ऐकता व एकात्मता रुजवणे जरुरीचे आहे. अशा प्रकारे मानवी ऐक्याचे बळ देशाला अगदी चंद्र-सूर्याच्याही पलीकडे घेऊन जाईल. अर्थात, पैगंबरांनी मानवी ऐकण्यासाठी केलेले प्रवर्तन आलम दुनियेसाठी एक कृपाशीर्वादच म्हणावा लागेल. (Eid e Milad Un Nabi mubarak)

Back to top button