Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात विसर्जनासाठी जीवरक्षक अन् स्वच्छतादूत! पालिका सज्ज | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात विसर्जनासाठी जीवरक्षक अन् स्वच्छतादूत! पालिका सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून, विसर्जन हौदांसह दोन हजार स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शहरात जागोजागी स्वच्छतागृहे आणि सर्व विसर्जन घाटांवर जीवरक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. आठवडाभरापासून शहरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी विसर्जन मिरवणुकीने होत आहे. ही विसर्जन मिरवणूक शुक्रवारी दुपारपर्यंत चालणार आहे.

विसर्जन मिरवणुकीस राज्यभरातील व राज्याच्या बाहेरीलही गणेशभक्त येतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपिंग, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदीकिनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहिरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

तसेच जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांची गळतीची ठिकाणे त्वरित दुरुस्ती कामे करण्यासाठी स्वतंत्र कर्मचा-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सूचना फलक आदी तयारी करण्यात आली आहे.

शहरातील प्रमुख विसर्जन घाट :

संगम घाट, – वृद्धेश्वर घाट/सिद्धेश्वर घाट, – अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ), – बापूघाट (नारायण पेठ), – विठ्ठल मंदिर (अलका चौक), – राजाराम पूल घाट, – ठोसरपागा घाट, – चिमा उद्यान येरवडा, – वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. 1 नदीकिनार, – नेने/आपटे घाट, – ओंकारेश्वर, – पुलाची वाडी/नटराज सिनेमा मागे, – खंडोजी बाबा चौक, – गरवारे कॉलेजची मागील बाजू, – दत्तवाडी घाट, – औंधगाव घाट, – बंडगार्डन घाट, – पांचाळेश्वर.

तीन ठिकाणी स्वागत मंडप :

महापालिकेच्या वतीने टिळक चौकासह (अलका टॉकीज) साहित्य परिषद-टिळक रस्ता, माती गणपती-नारायण पेठ असा तीन ठिकाणी गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात येणार आहेत.

255 ठिकाणी निर्माल्य संकलन

महापालिकेकडून शहरातील 255 ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 53 ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले जाणार आहेत. तर 153 विविध ठिकाणी लोखंडी कंटेनरची व्यवस्था केली आहे. कंटेनर भरल्यानंतर ते वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

गणेश विसर्जनासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापनाही केली आहे. या विभागाचे 020-25501269, 25506800, 25506801, 25500802 हे दूरध्वनी क्रमांक असून, त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळी दहा वाजता होणार मिरवणुकीस प्रारंभ

दरवर्षी महापौरांच्या हस्ते गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होतो. मात्र, सध्या महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने महापालिका आयुक्तांच्या हाती कारभार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्यास व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे.

हौदातच विसर्जन करा :

शहरातून वाहणार्‍या मुळा आणि मुठा नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन होईल, या दृष्टीने पालिकेने तयार केलेल्या हौदामध्ये तसेच लोखंडी टाक्यांमध्येच मूर्तींचे विसर्जन करावे. अधिकाधिक नागरिकांनी अशा पद्धतीनेच ‘श्रीं’चे विसर्जन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

अग्निशमन दलाचे 128 जीवरक्षक

दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागाने मुठा नदीकाठच्या एकूण 14 घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 17 फायरमन सेवक व 111 जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक दोन घाटांवर एका अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. या कर्मचार्‍याकडे लाइफ जॅकेट, लाइफ बॉय असे साहित्य असणार आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने गरवारे, संभाजी पूल, लकडी पूल या ठिकाणी नेकलेस जाळी लावण्यात आली आहे. याशिवाय नदीपात्रात जागोजागी आडवे दोरही बांधण्यात आले आहेत. त्यामुळे नदीत बुडणार्‍याला मदत मिळू शकणार आहे.

  • मिरवणुकीचा प्रारंभ सकाळी 10 वाजता होणार
  • विसर्जनासाठी 42 बांधीव हौद
  • विसर्जनासाठी 150 फिरते हौद
  • शहरात 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या
  • शहरात 1183 स्वच्छतागृहे
  • 400 फिरती स्वच्छतागृहे
  • 252 मूर्ती संकलन व मूर्ती दान केंद्रे
  • 256 ठिकाणी निर्माल्य कलश

हेही वाचा

World Tourism Day : जगभरातील पर्यटकांची गोव्यालाच पसंती

उमेदवारी हवी असेल तर भाजपमध्ये या! आ. नितेश राणे यांचे किरण सामंतांना खोचक आवतण

Pune Rain Update : पुण्यात रात्री पावसाचा धुमाकूळ; शहरात झाडपडीच्या तीन घटना

Back to top button