शिरूर : पुढारी वृत्तसेवा : अवैधरीत्या गावठी पिस्तूल विक्री करणार्या दोघांच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. ही कारवाई 18 सप्टेंबर रोजी रांजणगाव येथील राजेश पेट्रोलपंपासमोर करण्यात आली. आरोपींकडे केलेल्या अधिक चौकशीत आणखी 4 पिस्तूल व 3 जिवंत काडतुसे, 3 पालघन, असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. याप्रकरणी एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. संकेत संतोष महामुनी (रा. शिरूर, ता. शिरूर), प्रथमेश संतोष नवले (रा. कारेगाव, ता. शिरूर) आणि अन्य एक जणाला अटक करण्यात आली आहे. तर, पाच जण फरार झाले आहेत.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी हद्दीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्तुलांसह घातक शस्त्रास्त्रांची तस्करी होत आहे. दोन जण पिस्तूल विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महामुनी व नवले या दोघांना पकडले. अंगझडती घेतली असता, महामुनीच्या कमरेस 1 गावठी पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली.
दोघांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांचा एक मित्र राहत असलेल्या कारेगाव येथील खोलीवर पालघन ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला असता, 3 पालघन मिळून आल्या. संबंधित मित्र हा फरार झाला आहे. त्यानंतर आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, पोलिसांना आणखी 4 गावठी पिस्तूल जप्त करण्यात यश आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, बैजनाथ नागरगोजे, पोलिस जवान विजय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिणे यांच्या पथकाने केली.
मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून तालुक्यात विक्री
आरोपी हे मध्य प्रदेशहून पिस्तूल आणून तालुक्यात विकत होते. काही पिस्तुलांची त्यांनी विक्रीदेखील केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी पिस्तूल विकत घेणार्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यातील आरोपींची एकूण संख्या 8 झाली आहे. फरार झालेल्या 5 आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. शिरूर तालुक्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पिस्तूल सापडल्याने खळबळ उडाली आहे. पिस्तुलांच्या या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा :