भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : जॅकवेल कामातील निघणारे डबर भामा आसखेड धरणाच्या पाण्यात टाकून जलसाठा बुजवलेल्या ठेकेदारावर आणि पिंपरी-चिंचवड मनपा कार्यकारी अधिकार्यांवर कारवाई करण्यास भामा आसखेड जलसिंचन व्यवस्थापन उपविभागाचे अधिकारी चालढकल करीत आहेत. भामा आसखेड जलसिंचन व्यवस्थापन उपविभागाच्या अधिकार्यांनी फक्त पाहणी केली. डबर पाण्यात टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. करारनाम्यातील अटी व शर्ती पाळल्या नाहीत, तरीही त्यानी पिंपरी-चिंचवड मनपा पाणी-पुरवठा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना फक्त पत्र देण्याशिवाय काहीही केले नाही. ठोस कारवाई ठेकेदार व पिंपरी-चिंचवड मनपा कार्यकारी अधिकार्यांवर झाली नाही. जलसाठ्यात टाकलेले डबर उचलावे म्हणून ठेकेदारालाही पाठीशी घालण्यात येत आहे. त्याला फक्त तोंडी सूचना भामा आसखेडचे सहायक अभियंता यांनी दिल्या; परंतु लेखी पत्रही देण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. धरणाचे पाण्यात टाकलेले डबर ठेकेदाराकडून काढून घेऊन जलसाठा कसा खुला करावा, हा मोठा प्रश्न जलसंपदा विभागापुढे निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या :
डबर टाकून धरणातील पाणीसाठा बुजविला याविषयी दै. 'पुढारी' ने दोन वेळा बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर भामा आसखेड जलसिंचन व्यवस्थापन उपविभागाचे सहायक अभियंता अश्विन पवार यांनी दि.16 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता, डबर टाकून जलसाठा बुजविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जॅकवेलचे काम करणार्या ठेकेदाराच्या प्रकल्प व्यवस्थापकाला पाण्यात डबर न टाकण्याच्या सूचना करून पिंपरी-चिंचवड मनपा पाणी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्याशिवाय त्यांनी काही केले नाही.
डबरावर डबर टाकणे अद्यापही सुरूच
सध्या ठेकेदाराने पाण्यात डबर टाकण्याचे थांबविले असे दिसत असले, तरी ठेकेदार मात्र अजूनही अधूनमधून डबर पूर्वी टाकलेल्या पाण्यातील डबरावर टाकीत आहे. जलसंपदा विभागाने आता महानगरपालिका आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाण्यात टाकलेले डबर तत्काळ काढल्याशिवाय जॅकवेलचे काम करू न देण्याची कडक भूमिका जलसंपदाला घ्यावी लागणार आहे.
'विभागीय आयुक्तांना पत्र देणार'
पाण्यात डबर टाकून केलेल्या सपाट जागेत ठेकेदार अजूनही अधूनमधून डबर टाकीत आहे. याबाबत भामा आसखेड जलसिंचन उपविभागाचे सहायक अभियंता पवार यांना विचारले असता, पुणे विभागीय आयुक्तांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.