Pune Ganeshotsav 2023 : मिरवणुकीत स्थिर देखावे ठरणार लक्षवेधी | पुढारी

Pune Ganeshotsav 2023 : मिरवणुकीत स्थिर देखावे ठरणार लक्षवेधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत मंडळांचा स्थिर देखाव्यांचा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. दर वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात पुणेकरांना असे स्थिर देखावे पाहायला मिळणार असून, गणेश मंडळांकडून देखाव्यांसाठीचे बुकिंगही झाले आहे. पंचगंगा, महादेवरथ, गजलक्ष्मीरथ, भक्तिरथ, या विषयांवरील स्थिर देखाव्यांसह सामाजिक विषयांवरील देखावेही पुणेकरांचे लक्ष वेधणार आहेत.

स्थिर देखावे तयार करणार्‍या कलाकारांची देखाव्यांसाठी लगबग सुरू आहे. देखाव्यांसह मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतील रथांवर आकर्षक फुलांची सजावटही केली जाणार आहे. त्यासाठीही कलाकार तयारी करीत असून, विद्युतरोषणाईच्या देखाव्यांसाठीही तयारी करण्यात येत आहे. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मंडळांचे स्थिर देखावे आकर्षणाचा भाग असतात. यंदाही मिरवणुकीत वैविध्यपूर्ण विषयांवरील स्थिर देखावेही पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीसाठीच्या रथावर स्थिर देखाव्यांसाठीचे काम सुरू असून, 15 ते 16 जणांची टीम देखाव्यांसाठी काम करीत आहे. कलाकार विशाल ताजणेकर म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत अखिल मंडई मंडळासाठी विश्वगुरू हा रथ तयार करीत आहोत. दोन दिवसांपासून रथाचे काम सुरू केले असून, रथासाठी 15 कलाकार काम करीत आहेत. उत्सवात आपल्या कलेतून योगदान देऊन खूप आनंद मिळतो.

पदाधिकार्‍यांचा करणार मुस्लिम बांधव सन्मान

मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पाच गणपती मंडळांच्या बाप्पांचे स्वागत केले जाणार आहे. ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल यांच्या हस्ते मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्यात येईल. हा कार्यक्रम लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात सकाळी अकरा वाजता होणार आहे.

तसेच, शुक्रवारी (दि.29) सकाळी दहा वाजता मुस्लिम समाजबांधवांकडून बेलबाग चौकातच मिरवणुकीत अहोरात्र सेवा बजावणारे पोलिस, होमगार्ड, डॉक्टर, पारिचारिका यांना शिरखुरमा आणि सुकामेवा देण्यात येईल. त्यांच्या कामाविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली.

विसर्जन मिरवणुकीसाठीच्या रथावर यंदा स्थिर देखाव्यांसाठी मंडळांकडून चांगला प्रतिसाद आहे. अनेक कलाकारांकडून ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे तयार करण्यात येत आहेत. खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी आदिशक्तीरथ तयार करीत आहोत. देखाव्याचे काम सध्या सुरू आहे.

– संदीप गायकवाड, स्थिर देखावे तयार करणारे कलाकार

गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे रथ मनोहारी फुलांनी सजणार आहेत. विसर्जन मिरवणुकीत 14 ते 15 मंडळांच्या रथांवर फुलांची सजावट करणार आहोत. वेगवेगळ्या संकल्पेप्रमाणे ही सजावट करण्यात येणार असून झेंडू, गुलाब, शेवंती, डच गुलाब, अशा वैविध्यपूर्ण फुलांची सजावट करण्यात येईल. यंदा रथावर फुलांची सजावट करण्याला मंडळांकडून चांगला प्रतिसाद आहे.

– सुभाष सरपाले, फुलांचे व्यावसायिक

हेही वाचा

Nagar news : ‘जायकवाडी’च्या पाण्यासाठी संघर्ष करणार : ऋषिकेश ढाकणे

Goa News : म्हादई व्याघ्रक्षेत्र स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

परभणी : मानवतला जोरदार पावसात जुने दुमजली घर कोसळले

Back to top button