समाजभान : समाजाच्या पुनर्रचनेसाठी सत्यशोधक चळवळ | पुढारी

समाजभान : समाजाच्या पुनर्रचनेसाठी सत्यशोधक चळवळ

डॉ. अरुण शिंदे

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने एका लोकचळवळीचे रूप धारण करून सामाजिक व धार्मिक पुनर्रचनेसाठी प्रबोधनाचा व परिवर्तनाचा झंझावात निर्माण केला. महाराष्ट्राच्या सामाजिक जडण-घडणीमध्ये सत्यशोधक चळवळीचे अनन्यसाधारण योगदान आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 24 सप्टेंबर 2023 रोजी दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने…

महात्मा जोतीराव फुले (1827-1890) हे आधुनिक भारतातील एक अत्यंत महत्त्वाचे समाजसुधारक, तत्त्वचिंतक, शिक्षणतज्ज्ञ, शेतकर्‍यांचे कैवारी, साहित्यिक व लोकसंघटक होते. त्यांनी शोषित, वंचितांच्या शोषणमुक्तीची एक मूलगामी विचारसरणी मांडली. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून व्यवस्था परिवर्तनासाठी शूद्रातिशूद्रांचे संघटन भारताच्या सामाजिक इतिहासामध्ये प्रथमच उभे केले. माणसाच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडून तो मुक्त व्हावा व त्याचे मनुष्यपण सर्वार्थाने विकसित व्हावे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. पुरोहितशाहीच्या जोखडातून शूद्रातिशूद्रांची मुक्तता, सावकारशाहीविरुद्ध लढा, शेतकरी-कामगारांचे संघटन, धार्मिक स्वावलंबन, प्राथमिक शिक्षणप्रसार, साहित्य, नियतकालिके, प्रचारक, परिषदा, सभा, जलसे अशा अनेक माध्यमांतून सत्यशोधक समाजाला एका लोकआंदोलनाचे रूप प्राप्त झाले.

सत्यशोधक समाजाचे सभासद होताना सर्व मानवप्राण्याशी बंधुभावाने वागण्याची, धार्मिक विधीतून मध्यस्थांच्या उच्चाटनाची आणि मुला-मुलींना शिक्षण देण्याची शपथ घ्यावी लागे. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला समाजाचे सभासद होता येत असे. शिक्षण, पुरोहितशाहीचे स्वरूप, जातिव्यवस्था, मूर्तिपूजा, कर्मकांडे, दारूबंदी, मागासलेल्या वर्गाची स्थिती, सावकारशाही अशा विषयानुरोधाने सभेत चर्चा होई.

सत्यशोधक चळवळीने प्रस्थापित वैदिक परंपरेची बुद्धिवादी द़ृष्टिकोनातून कठोर चिकित्सा केली. वेद, श्रुती, स्मृती, पुराणे आदींमधील तत्त्वज्ञानाला व आशयाला तर्कशद्ध आव्हान दिले. सत्यशोधन या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर होता. हे सत्यशोधन प्रत्येकाने आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत बुद्धीने करावयाचे होते. व्यक्तीला विचारशील बनवून आधुनिक समाजरचना निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, बाबाप्रामाण्य वगैरे प्रामाण्यवादाला त्यांनी नकार दिला. बुद्धिवाद व इहवादाचा जोरदार आग्रह धरला. प्रस्थापित वर्ण-जातिप्रधान समाजव्यवस्था व कर्मठ पक्षपाती धर्मसंस्था यांची परखड चिकित्सा केली. सर्व तर्‍हेच्या विषमतेस व शोषणास त्यांनी विरोध केला. पुरोहितशाहीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ईश्वर व भक्त यांच्यामधील मध्यस्थांच्या उच्चाटनाची जाहीर भूमिका घेतली.

पुरोहितशाहीमध्ये धार्मिक गुलामगिरीचे व शोषणाचे मूळ आहे, असा त्यांचा दावा होता. देवा-धर्माच्या नावाखाली व्यक्तीला मानसिक गुलाम बनवून त्याचे शोषण करणार्‍या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिले. परमेश्वराला कोणी पाहिलेला नसताना, त्याची मूर्ती कशी निर्माण करता येईल? असा मूलभूत प्रश्न उपस्थित केला. मूर्तिपूजेपेक्षा सदाचारी वर्तनावर भर दिला. प्रत्येकाने स्वत:चे धर्मविधी व विवाह स्वत:च करावेत, असा आग्रह धरला.

लोकसंस्कृतीतील परंपरा, प्रतीके, लोकदैवते यांचा पुरस्कार करून बहुजनांच्या लोककल्याणकारी संस्कृतीशी स्वत:ला जाणीवपूर्वक जोडून घेतले. सर्व माणसे समान आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने केले जाणारे भेद कृत्रिम व खोटे आहेत, अशी त्यांची धारणा होती. समता, बंधुता, स्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठा या मूल्यांच्या पायावर नवा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजापासून प्रेरणा घेऊन दक्षिण भारतात 1915 पासून ब्राह्मणेतर चळवळ उदयास आली.

प्राथमिक शिक्षणावर दिलेला सर्वाधिक भर, हे सत्यशोधक समाजाचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची आग्रही मागणी सातत्याने केली. लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. सत्यशोधक चळवळीच्या कार्यातूनच मराठा शिक्षण परिषद, रयत शिक्षण संस्था यांसारख्या शिक्षण संस्था सुरू झाल्या. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात झालेला शिक्षणप्रसार व शिक्षणाविषयी सजगता याचे मोठे श्रेय सत्यशोधक चळवळीला जाते.

शेतकरी-कष्टकरी श्रमिक वर्ग हा सत्यशोधक चळवळीचा केंद्रबिंदू होता. सत्यशोधकांनी भटजी, शेटजी, सरकार, सरकारी नोकर व जमीनदारांकडून शेतकर्‍यांच्या होणार्‍या आर्थिक शोषणाची मीमांसा केली. त्याविरुद्ध शेतकर्‍यांना संघटित करून लढे उभारले. ‘दीनबंधु’, ‘शेतकर्‍यांचा कैवारी’, ‘दीनमित्र’, ‘विजयी मराठा’, राष्ट्रवीर’,‘जागृति’ आदी नियतकालिकांनी शेतकर्‍यांचे प्रश्न धसास लावले. जमीनदार व सावकारांच्या शोषणातून मुक्ततेसाठी सहकाराचा उपाय मांडला. सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली सहकार चळवळ सत्यशोधकांच्या प्रयत्नातून निर्माण झाली आहे.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना ‘बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन’ मुंबई येथे स्थापन केली. ‘दीनबंधु’ हे श्रमिकांचे पहिले मुखपत्र चालविले. कामगारांचे कामाचे तास कमी करणे, रविवारची सुट्टी, बालकामगारांना बंदी, स्त्रियांना रात्रपाळीस मनाई यांसारखे कामगार हिताचे निर्णय लोखंडेंच्या नेतृत्वाखालील संघटनेमुळे झाले.

प्रारंभीचे दलित पुढारी गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे हे सत्यशोधक चळवळीशी जवळून निगडित होते. दलितामध्ये जागृती व आत्मभान निर्माण करण्याचे कार्य सत्यशोधक चळवळीने केले. सत्यशोधक समाजमतानुसार दलितांचे विवाह, मंदिरप्रवेश, सहभोजन, सार्वजनिक पाणवठे खुले करणे इत्यादी माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रयत्न सत्यशोधक चळवळीने केला.

महात्मा फुले यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ स्त्री शिक्षणापासून केला. स्त्रियांचे प्रश्न व त्यांच्या शिक्षणावर फुल्यांनी लक्ष केंद्रित केले होते. ताराबाई शिंदे या पहिल्या बंडखोर स्त्रीवादी लेखिका सत्यशोधक समाजाच्या प्रभावातून घडल्या. 1925 नंतर ब्राह्मणेतर स्त्रीपरिषदा भरविण्यात आल्या. परंतु एकूणच स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याचे आढळते. शेतकरी-कष्टकरी स्त्रियांच्या मागासलेपणाचे मूळ सत्यशोधक चळवळीने केलेल्या दुर्लक्षामध्ये आहे, असे जाणवते.

‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अत्यंत व्यापक अर्थ सत्यशोधक चळवळीने सांगितला. तत्कालीन राष्ट्रीय सभा व तिचे उच्चवर्णीय पुढारी ब्रिटिशांच्या राजकीय गुलामगिरीविरुद्ध आंदोलन करीत होते. पण याचवेळी आपल्या लक्षावधी देशबांधवांवर धार्मिक व सामाजिक गुलामगिरी लादून त्यांच्या न्याय्य मानवी हक्कांची गळचेपी करीत होते. उच्चवर्णीय नेत्यांची व राष्ट्रीय सभेची ही दुटप्पी व संकुचित वृत्ती सत्यशोधकांनी उघडी पाडली. धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला. सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्तता ही स्वातंत्र्याची अत्यंत व्यापक संकल्पना मांडली. स्वातंत्र्याची कक्षा राजकीय क्षेत्रापुरती सीमित न ठेवता, व्यक्ती व समाजजीवनाच्या सर्व अंगांपर्यंत रुंदावली. 1919 नंतर त्यांनी नव्या राजकीय सुधारणा कायद्यान्वये निवडणुकांमध्ये भाग घेतला. काही लोकल बोर्डांमध्ये ब्राह्मणेतर पक्षाची सत्ता आली. मुंबई कायदे मंडळात ब्राह्मणेतर पक्षाच्या सदस्यांनी बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. बहुजन समाजात राजकीय जागृतीचे पर्व सुरू झाले. त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर बहुजन समाजाचे वर्चस्व आहे. ग्रामीण भागातून महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते निर्माण झाले आहेत.

सत्यशोधक चळवळीच्या प्रचारासाठी प्रबोधनपर वाङ्मय निर्माण झााले. बहुजनांची पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेतून 1930 पर्यंत साठहून अधिक नियतकालिके निघत होती. त्यांनी परिवर्तनवादी पत्रकारितेचा मानदंड निर्माण केला. अभ्यासकांनी मात्र सत्यशोधक वाङ्मयाची व पत्रकारितेची दखल घेतलेली नाही. सत्यशोधक समाजाने सामान्य माणसामधील ‘स्वत्व’ जागे केले. त्यांच्यामधून समर्थ लेखक, संपादक, शास्त्री, पंडित, शिक्षणतज्ज्ञ, संघटक, नेते, प्रचारक, कार्यकर्ते, कीर्तनकार, जलसाकार वगैरे कर्तृत्ववान व्यक्तींची पिढी निर्माण झाली. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया घातला.

सत्यशोधक चळवळ ही अत्यंत तर्कवादी, बुद्धिवादी व वैज्ञानिक द़ृष्टिकोनावर आधारलेली चळवळ होती. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्रात प्रचंड मोठी वैचारिक घुसळण केली. त्यामुळे विविध क्षेत्रांत अनेक रचनात्मक कामे उभी राहिली. आजच्या आधुनिक महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा पाया सत्यशोधक विचाराने घातला आहे. परंतु अलीकडील काळात सत्यशोधक समाजाचे कार्य, विचार, कार्यकर्ते, सत्यशोधक समाजाचा इतिहास वगैरे सर्व विस्मृतीत जात आहे. सत्यशोधक समाजाचा इतिहास नव्या पिढीस माहीत नाही. त्यामुळे आपल्या एका क्रांतिकारी, प्रबोधनपर वैचारिक वारशास आपण मुकत आहोत. सत्यशोधक विचारवारशाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आजच्या वर्तमान सामाजिक प्रश्नांसंदर्भात सत्यशोधक विचारांचा अन्वयार्थ लावून सत्यशोधक विचार गतिमान करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज धार्मिक पुनरुज्जीवनवादी शक्ती सर्व बाजूंनी उठाव करीत आहेत. बुवा, बाबा, बापू, माँ वगैरे नावांनी धर्ममार्तंडांचे प्रस्थ वाढत असून, समाज मानसिक गुलामगिरीकडे पुन्हा जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सामान्य माणसाची विचारप्रक्रियाच थांबविली आहे. बुद्धिवाद, चिकित्सा, विचार, विवेक या समाजाच्या वैचारिक वृद्धीसाठी आवश्यक बाबींचा अभाव आढळतो आहे. धार्मिक व जातीय भावना हा कळीचा मुद्दा बनला आहे.

जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरणाच्या नावाखाली नवभांडवलशाही येत आहे. श्रीमंत व गरिबांमधील दरी प्रचंड वाढत असून, तीव्र आर्थिक विषमता निर्माण होत आहे. कामगार संघटना व कामगार कायदे मोडीत काढले जात आहेत. शेतकरी आर्थिक विपन्नावस्थेमुळे आत्महत्या करीत आहेत. सहकार चळवळीस भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. सामान्यांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट बनला आहे. जागतिकीकरणात सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, आदिवासी, दलित, शहरी झोपडपट्ट्यांतील मजूर, कामगार, बालकामगार, भटक्या जाती-जमाती यांचे भवितव्य अंधकारमय आहे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील दरी वाढत आहे.

एकूणच, आज समाजात समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा, बंधुता, सहिष्णुता, बुद्धिवाद आदी मूल्यांची वानवा होत आहे. धार्मिक, सामाजिक, मानसिक व आर्थिक गुलामगिरीची दाट छाया पडत चालली आहे. या अस्वस्थ करणार्‍या वास्तवातून वाट काढण्यासाठी सत्यशोधक चळवळीचे विचार आजही उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.

Back to top button