Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून

Monsoon Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सोमवारपासून

पुणे, पुढारी वृत्तसेवा : देशासह राज्यात यावर्षी अतिशय कमी प्रमाणात बरसलेला मान्सून आता परतीच्या प्रवासाला निघाला आहे. 25 सप्टेंबर म्हणजेच येत्या सोमवारपासून पश्चिम राजस्थानपासून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्यासाठी अनुकूल स्थिती तयार झाली असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला. दरम्यान, राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशात यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिशय कमी प्रमाणात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात केवळ जुलै महिन्यात दहा ते बारा दिवस जोरदार पाऊस झाला. त्याही आधी जून महिना जवळजवळ कोरडाच गेला; तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा निम्मा महिना तुरळक ठिकाणीच किरकोळ भागात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प होते. देशाच्या ईशान्य आणि मध्य भारतात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावून दाणादाण उडवून दिली. असे असले तरी यावर्षी पावसाने शेतकर्‍यांसह नागरिकांना अनेक धक्के दिले आहेत.

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी राजस्थानच्या पश्चिम भागात मोकळे आकाश तसेच अँटी चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे 25 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

राज्यात बहुतांश जिल्ह्यांत सोमवारपर्यंत 'यलो अलर्ट'

राज्यात गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे. 25 सप्टेंबरपर्यंत बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे. शुक्रवारी (दि. 21) कोकण, घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. 25 सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांत यलो अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, नगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news