Good News : भाटघर धरण ‘ओव्हरफ्लो’ ; गतवर्षीपेक्षा तब्बल 38 दिवसांनंतर धरण भरले

भोर/निरा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरले असून, धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून 475 क्यूसेक व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 1 हजार 614 क्यूसेक असा एकूण 2 हजार 79 क्यूसेक विसर्ग निरा नदीपात्रामध्ये सुरू आहे. भाटघर धरण बुधवारी (दि. 20) रात्री 11 च्या सुमारास 100 टक्के भरले. पाटबंधारे विभागाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता धरणावरील वीजनिर्मिती केंद्र सुरू करून त्यामधून 1 हजार 614 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. बुधवारी सकाळी धरणात 98.82 टक्के पाणीसाठा होता. परंतु धरणपट्ट्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. रात्री 11 वाजता धरणात 100 टक्के म्हणजे 23.74 टीएमसी पाणीसाठा झाला.
निरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे पाटबंधारे विभागाने निरा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात कोणत्याही विभागाचे काम सुरू असेल, तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नदीपात्रात पिण्याच्या व शेतीसाठी असलेले पंप सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी केले.
हेही वाचा :