डाळिंबाला प्रतिकिलोस विक्रमी 611 रुपये भाव | पुढारी

डाळिंबाला प्रतिकिलोस विक्रमी 611 रुपये भाव

बावडा : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या कचरवाडी (बा.) येथील विठ्ठल सिद्धू फडतरे या शेतकर्‍याच्या डाळिंबास आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरीनाथ नागणे या व्यापार्‍याकडे प्रतिकिलोस विक्रमी 611 रुपये प्रतिकिलो भाव बुधवारी (दि. 20) मिळाला. आजपर्यंत डाळिंबास मिळालेला हा राज्यातील विक्रमी भाव ठरण्याची शक्यता आहे. बावडानजीक असलेल्या कचरवाडी (बा.) येथील विठ्ठल फडतरे व रामदास फडतरे या बंधूंच्या 18 एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेची 15 ऑगस्टपासून तोडणी सुरू आहे.

संबंधित बातम्या :

सुरुवातीला त्यांना 110 ते 120 रुपये प्रतिकिलो एवढा सरासरी भाव मिळाला. मात्र, आता बुधवारी (दि. 20) त्यांनी बाजारात नेलेल्या डाळिंबापैकी निर्यातक्षम असलेल्या 5 क्रेट म्हणजेच 92 किलो डाळिंबांना प्रतिकिलो तब्बल 611 रुपये असा उच्चांकी दर मिळाला, तर सरासरी 212 रुपये एवढा भाव मिळाला आहे. आजअखेर 100 टनापेक्षा जास्त डाळिंबाची विक्री झाली असून, आणखी सुमारे 15 ते 20 टन डाळिंबाची विक्री होईल, असे विठ्ठल फडतरे यांनी सांगितले. चालू वर्षी आणखी 6 एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button