Pune Ganeshotsav 2023 : शिवाजीनगर आगारात ‘महाबळेश्वर मंदिर’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एसटीच्या शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारात एसटी कर्मचार्यांनी एकत्र येत, महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. एसटी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी महिनाभरापासून काम करून हा देखावा तयार केला आहे. शिवाजीनगर आगार हे दरवर्षी अनोखे गणपती देखावे साकारण्यासाठी प्रसिध्द आहे.
मंडळाने कोरोनाकाळात एसटी बसमधून झालेल्या पालखी सोहळ्याचा हुबेहुब देखावा साकारला होता. यात बसची छोटी प्रतिकृती सजवून माउली, तुकोबांच्या पालख्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने धावत असल्याचे दाखविले होते. त्यानंतर आता आगारातील कर्मचार्यांनी महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. पंचगंगा मंदिरात ज्या प्रमाणे गोमुखातून पाणी पडताना दिसते त्याप्रमाणेच येथे देखावा साकारला आहे.
मूळ मंदिराविषयी …
महाबळेश्वराच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या पाच नद्या उगम पावतात. त्याला पंचगंगेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण क्षेत्र महाबळेश्वर म्हणूनसुध्दा प्रसिद्ध आहे. ‘सावित्री’ ही नदी पश्चिम वाहिनी आहे, तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिन्या आहेत. तसे पाहिले तर कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, आणि भागीरथी या 7 नद्यांचे हे उगमस्थान आहे. यापैकी पहिल्या पाच नद्यांचा ओहोळ सतत बाराही महिने वाहात असतो. सरस्वतीचा ओहोळ मात्र प्रत्येक 60 वर्षांनी दर्शन देतो. आता तो 2034 साली दर्शन देईल, तर भागीरथीचा ओहोळ प्रत्येक 12 वर्षांनी दर्शन देतो, असे सांगतात. हे मंदिर 4 हजार 500 वर्षांपूर्वीचे आहे, असे सांगितले जाते. याच मंदिराची प्रतिकृती शिवाजीनगर आगारातील कर्मचार्यांनी एकत्र येत साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
यांनी साकारला देखावा…
शिवाजीनगर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी राहुल घोलप, जीवन महाडिक, मारुती हरगुडे, विजय बुटे यांनी हा देखावा साकारला आहे.
हेही वाचा
आकुर्डी : बाप्पाच्या विसर्जनासाठी जाधव घाट सज्ज
परभणी : एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लंपास
भाजप खासदाराची भर संसदेत बसपा खासदारावर आक्षेपार्ह टिप्पणी, म्हणाले…