प्लास्टिक फुलांमुळे हरवला सण-उत्सवांतील सुगंध | पुढारी

प्लास्टिक फुलांमुळे हरवला सण-उत्सवांतील सुगंध

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : सध्या गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र जोरात सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठा विविध वस्तू साहित्यांने सजलेल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाजारपेठांमध्ये प्लास्टिक फुलांच्या हार, माळा, तोरणे विक्रीसाठी येत आहेत. ग्राहकांचीदेखील त्याच हार, तोरणांना पसंती असल्याचे दिसत आहे. परंतु याचा फूल उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसू लागला आहे. कोरोना संकटानंतर बाजारपेठांमध्ये प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला दिसत असल्याने नैसर्गिक फुलांची पिके घेणारे शेतकरी अडचणीत
सापडले आहेत.

उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांमध्ये फुलशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. श्रावण महिन्यापासूनच या भागातील विविध फुले मुंबई, पुणे बाजारपेठेसह इतर राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये विक्रीकरिता जातात. यातून फूल उत्पादक शेतकर्‍यांना चांगले अर्थार्जन होत असते. परंतु कोरोनाच्या संकटाचा फुलशेतीला खूप मोठा फटका बसला. त्या संकटानंतर फुलांना सणासुदीच्या काळातदेखील बाजारभाव चांगले मिळाले नाहीत.

या भागात झेंडूच्या विविध संकरित जातींची फुलांची पिके शेतकरी घेतात. त्याचे उत्पादनदेखील चांगले मिळते. परंतु फुलांना सातत्याने कवडीमोल बाजारभाव मिळून फुलांच्या पिकासाठी गुंतविलेले भांडवल वसूल न होता ते शेतकर्‍यांच्याच अंगावर येत आहे. यापूर्व काळात सणासुदीत, धार्मिक कार्यक्रमांमध्ये नैसर्गिक फुलांचाच वापर होता. परंतु आता हुबेहूब दिसणारी प्लास्टिक फुले कमी किंमतीत मिळू
लागली आहेत. आकर्षक रंगीबेरंगी, दीर्घकाळ टिकणारी ही फुले असल्याने ग्राहकांचीदेखील पसंती याच फुलांना आहे. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा :

Back to top button