कुडाळ : वासुदेवाचा पेहराव करून पैसे उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्‍यात | पुढारी

कुडाळ : वासुदेवाचा पेहराव करून पैसे उकळणारी टोळी पोलिसांच्या ताब्‍यात

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा ऐन गणेशोत्सव कालावधीत वासुदेवाचा पेहराव करून गावोगावी फिरून लोकांकडून पैसे उकळणा-या बारामती येथील पाच जणांच्या टोळीला कुडाळ शहरात जागृत नागरीकांनी पकडून चांगलाच प्रसाद दिला. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली. या पाचही जणांना नागरीकानी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे.

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. याच दरम्यान (गुरूवार) कुडाळ तालुक्यातील वाडीवरवडे आणि पिंगुळी परिसरात वासुदेवाचा पेहराव करून तीन ते चारजणांनी घरोघरी जाऊन घरातील महिला तसेच अन्य सदस्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडून दामदुप्पट पैसे घेतले. पाचशे रुपयांपासून पुढे मोठ मोठी रक्कम या वासुदेवरूपी लोकांकडून नागरिकांकडे मागणी करण्यात येत होती. काहींनी तर त्यांना मोठ मोठी रक्कम दिलीही. त्यानंतर ही टोळी लोकांची फसवणूक करून लूट करीत असल्याचे लक्षात येताच, जागृत नागरीक या वासुदेवांच्या मागावर राहीले. अखेर (शुक्रवार) सकाळी कुडाळ कुंभारवाडी परिसरात वासुदेवाचा पेहराव करून घरोघरी जाऊन पैशांची मागणी करणा-या पाच जणांना पकडून त्‍यांना चांगलाच प्रसाद दिला.

लोकांकडून प्रसाद मिळताच त्यांनी आपणाकडून चूक झाल्याचेही मान्य केले केले. फसवणूक झालेल्या काहींनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पाचही जणांना नागरीकांनी कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. सदरचे पाचहीजण बारामती येथील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, मंगेश चव्हाण, अमित चव्हाण, विपूल धुरी, सचिन चव्हाण, सुरज चव्हाण, संदीप कुंभार, संदिप पावसकर, आबा चव्हाण, प्रविण पाटकर, महेश धुरी आदींसह पिंगुळी व वाडीवरवडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button