कोल्हापूर : गुंतवणूकदारांची दीड हजार कोटींची फसवणूक; लोहितसिंगची कबुली | पुढारी

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची दीड हजार कोटींची फसवणूक; लोहितसिंगची कबुली

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांना गंडा घालून फरारी झालेल्या लोहितसिंग धर्मसिंग सुभेदार (रा. किर्लोस्करवाडी, सांगली) याने सुमारे दीड हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. लोहितसिंगला 19 सप्टेंबर रोजी पोलिसांनी अटक केली असून, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, लोहितसिंगला न्यायालयाने 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

लोहितसिंग अत्यंत चालाक आहे. सतत सिम कार्ड बदलून, ट्रकमधून प्रवास करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. लोहितसिंगकडे असणारा अमाप पैसा पाहून कोल्हापुरातील काही जणांनी त्याच्याकडून खंडणी वसूल केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे, असेही पंडित यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंडित म्हणाले, अनेक गुंतवणूकदार तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. या गुन्ह्यामध्ये काही संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे. महत्त्वाचा सूत्रधार लोहितसिंग हा पोलिसांना गुंगारा देत होता. 19 सप्टेंबरला तो नवी मुंबईतून कोल्हापूरला येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पथकाने किणी टोल नाका येथे त्याला पकडले. लोहितसिंग हा कोल्हापुरातील एका मंडळाच्या गणेशाचा भक्त आहे. त्याच्या दर्शनासाठी तो येणार होता. नवी मुंबई येथून तो ट्रकमधूनच किणी टोल नाक्याजवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बारा कोटींच्या मालमत्तेची जप्तीची प्रक्रिया सुरू

यापूर्वी अटक केलेल्या संशयितांपैकी बाबासो धनगर व बाबू हजारे यांनी खरेदी केलेले 6 प्लॅट, वंदूर (ता. कागल) येथील 5 एकर जमीन, उजळाईवाडी, मुडशिंगी, के.आय.टी. कॉलेजजवळील 3 प्लॉट, दोन दुचाकी ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित अमित शिंदे याचे कदमवाडी येथील पेंट हाऊस, 1 फ्लॅट, पाडळी येथील 12 गुंठे जागा, पळसंबे (ता. गगनबावडा) येथील 8 एकर जमीन, दोन चारचाकी वाहने, श्रुतिका सावेकरचे 6 लाखांचे दागिने, लोहितसिंगच्या पत्नीचे 25 लाखांचे दागिने व अडीच लाखांचे हिरे हस्तगत केले आहेत. जुलै 2023 पासून सुमारे 12 कोटींच्या मालमत्तेचा शोध लागला असून, जप्तीची प्रक्रिया सुरू आहे. हा तपास उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्वाती गायकवाड पोलिस हवालदार दीपक सावंत, प्रवीण चव्हाण आदींनी केला.

रुबाबदार लोहितसिंगच्या हातात बेड्या

लोहितसिंगचा रुबाब वेगळाच असायचा. भोवती बाऊन्सरचे संरक्षक कडे, उंची कपडे, आलिशान मोटार आणि पंचतारांकित हॉटेलमधील बैठका, असा त्याचा शाही थाट होता. पोलिसांनी बेड्या घातल्यानंतर त्याचा रुबाब उतरला आहे. पोलिसांनी त्याला बुरखा घालून माध्यमांसमोर उभे केले. यावेळी तो खाली मान घालून शांत उभा होता.

मोबाईल वारणा नदीत फेकला

लोहितसिंग पोलिसांना चकवा देत होता. मोबाईल व सिम कार्ड सतत बदलत होता. 19 सप्टेंबरलाही त्याच्याकडे एक मोबाईल होता. तो मोबाईल त्याने वारणा नदीत फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button