पिंपरी : व्हायरल पोस्टचा लॅबमध्ये ‘पोस्टमॉर्टम’ | पुढारी

पिंपरी : व्हायरल पोस्टचा लॅबमध्ये ‘पोस्टमॉर्टम’

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सामाजिक तेढ निर्माण करणासाठी समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक काही पोस्ट व्हायरल करण्यात येतात. कोणतीही सत्यता न तपासता तरुणांकडून मेसेज फॉरवर्ड होत असल्याने धर्मीयांच्या मनामध्ये कटुता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात आता सोशल मीडिया लॅब सुरू करण्यात आली आहे. आक्षेपार्ह मेसेजच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम या लॅबमध्ये होणार आहे.

त्यामुळे आलेला मेसेज सत्यता न तपासात फॉरवर्ड करणे, आगामी काळात अंगलट येऊ शकते. अवैध व्यवसायांवरही लक्ष हातात कोयता-पिस्तूल घेऊन स्टेटस ठेवणार्‍यांवर यापूर्वी गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली होती. दरम्यान, इंस्टाग्रामच्या माध्यमातून बेकायदा शस्त्र विक्री होत असल्याचेदेखील समोर आले होते. सोशल मीडियाचा वापर अवैध उद्योगांसाठी होत असल्याने त्याच्यावरही सोशल मीडियाच्या लॅबमधून लक्ष राहणार आहे.

24 तास करडी नजर

दोन अधिकारी आणि दहा कर्मचारी चोवीस तास सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवून आहेत. आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये सध्या या सेलचे काम सुरू आहे. एखादे आंदोलन, मोर्चा, देशात एखाद्याने केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शहर पातळीवर लोक कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात, याचा देखील आढावा लॅबमधून घेतला जात आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदींवर पोस्ट करताना वाद निर्माण होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. एखाद्या पोस्टमुळे ठराविक समाजाच्या भावना दुखावून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती असते. सामान्य नागरिकांना या सगळ्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. सोशल मीडियावरती व्यक्त होताना हल्ली सातत्याने वादाचे प्रसंग घडत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लॅबमध्ये सगळ्या पोस्टवर वॉच राहणार आहे.

सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवत असल्याने नेटिजन्स कोणत्या प्रकारे व्यक्त होतात, हे पडताळून पाहणे आता गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र सेल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामामुळे अनेक संभाव्य वाद टाळता आले आहेत.

– सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी पिंपरी-चिंचवड पोलिस

हेही वाचा

Nashik Ganeshotsav : निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले

नाशिक : भाजपची ग्रामीण (उत्तर) कार्यकारिणीही घोषित

Shevai Kheer : बाप्पाच्या प्रसादासाठी साजूक तुपातील शेवयाची खीर

Back to top button