पुणे; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिना उजाडला तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये अद्याप 'कमवा व शिका' योजना सुरू होऊ शकली नाही. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेकडून योजना सुरू करण्यास परवानगी न मिळाल्यामुळे आणि निधी खर्च करण्यास मंजुरी मिळाली नसल्याने विद्यार्थी कमवा व शिका योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक साहाय्य व्हावे, स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे, विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृतीची जाणीव निर्माण व्हावी, विविध प्रकारची कामे करून मिळणार्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने कमवा व शिका योजना राबविली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कमवा व शिका योजनेचा लाभ घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. त्यातच आता अर्धा सप्टेंबर महिना संपला तरीही कमवा व शिका योजनेस विद्यापीठाकडून मंजुरीच मिळाली नाही.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात कमवा व शिका योजनेसाठी भरीव तरतूद केले जाते. तसेच हा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेत व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर केला जातो. परंतु, दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कमवा व शिका योजना सुरू करून त्यासाठीचा निधी खर्च करण्यास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागते. गेल्या दोन महिन्यात व्यवस्थापन परिषदेमध्ये प्र- कुलगुरू निवडीवरच चर्चा झाली. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक स्थगित करण्यात आली. परिणामी विद्यार्थी कल्याण विभागाच्या कमवा व शिका योजनेच्या प्रस्तावास मंजुरी मिळू शकली नाही. त्यामुळे अद्याप विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये कमवा व शिका योजना सुरू होऊ शकली नाही.
कमवा व शिका योजनेत 10 टक्के महाविद्यालयांचे, तर 90 टक्के रक्कम विद्यापीठाकडून देण्यात येत असते. व्यवस्थापन परिषदेने मंजुरी न दिल्यामुळे कमवा व शिका योजनेची अंमलबजावणी करता आली नाही. परंतु याच महिन्यात व्यवस्थापन परिषदेत कमवा व शिका योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. परंतु, तत्पूर्वीच महाविद्यालयांना ऑगस्ट कमवा व शिका योजनेची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
– डॉ. अभिजित कुलकर्णी,
संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
हेही वाचा