नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आशिया चषक 2023 आता संपला आहे. टीम इंडिया विक्रमी आठव्यांदा आशियाचा बॉस बनली आहे. अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेला दहा विकेटस्नी धूळ चारली. अंतिम सामन्यात सिराजच्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आणि स्पर्धेवर आपला अमिट ठसा उमटवला असला तरी या स्पर्धेत फलंदाजांनीही चांगलेच प्रभावित केले आहे. या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणार्या टॉप फाईव्ह फलंदाजांची कामगिरी पाहू…
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलची बॅट आशिया चषकात चांगलीच तळपली. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याची बॅटिंग म्हणावी तशी झाली नाही. पाकिस्तानी गोलंदाजाविरुद्ध त्याचे फुटवर्क होत नव्हते. म्हणून त्याच्यावर टीका झाली; परंतु नंतर त्याने चांगलाच वेग पकडला. गिलने 6 सामन्यांत 75.50 च्या सरासरीने 302 धावा केल्या. त्याने 2 अर्धशतके आणि 1 शतक झळकावले. तो स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.
श्रीलंकेचा स्टार फलंदाज कुसल मेंडिसनेही श्रीलंकेसाठी जोरदार बॅटिंग केली. कुसलने 6 सामन्यांत 45 च्या सरासरीने
270 धावा केल्या. त्याच्या नावावर 3 अर्धशतके आहेत.
श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज सदिरा समरविक्रमा याने सहा सामन्यांत 215 धावा केल्या. त्याची सरासरी 35.83 अशी राहिली. त्याने दोन अर्धशतके नोेंदवली.
पाकिस्तानचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज बाबर आझमने स्पर्धेच्या सुरुवातीला चांगली छाप सोडली. त्याने नेपाळविरुद्ध 151 धावा करताना दीडशतक केले. त्याने 51.75 च्या सरासरीने 207 धावा केल्या.
पाकिस्तानचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने 5 सामने खेळले. यात त्याने 97.50 च्या सरासरीने 195 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकेही निघाली.