Pune Crime : भाड्याचे आमिष दाखवून ५५ कार, जीप केल्या गायब | पुढारी

Pune Crime : भाड्याचे आमिष दाखवून ५५ कार, जीप केल्या गायब

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा : Pune Crime : औरंगाबाद आणि हिंजवडी आयटी पार्कमध्ये गाड्या भाड्याने लावायच्या आहेत. महिना २५ ते ३० हजार रुपये भाडे मिळेल असे आमिष दाखवून अनेकांच्या गाड्या ताब्यात घेऊन या अलिशान गाड्या परस्पर पर राज्यात, जिल्ह्यात भाड्याने दिल्याचा किंवा विक्री केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील अशा ५५ गाड्यांच्या बाबतीत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इनोव्हा, स्विफ्ट, इको, नेकसान, हुंडाई, आर्टिगा, वॅगनआर अशा विविध कार व महागड्या जीपचा त्यात समावेश आहे. सागर मोहन साबळे (रा. साबळेवाडी, ता. खेड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात अमोल मनाजी भागडे (रा. पाडळी, ता. खेड) व शुभम बाळू सांडभोर, (रा. थिगळस्थळ, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांनी दिली.

स्व वापरासाठी घेतलेल्या या गाड्या जास्त भाडे मिळण्याच्या लालसेपोटी गाडी मालकांनी दिल्या. त्यासाठी अनेकांनी बँक, फायनान्स कंपन्यांचे कर्ज घेतले आहे. कराराने गाड्या दिल्यावर त्यासाठी ड्रायव्हरची व्यवस्था साबळे हाच पाहणार होता. परिणामी गाडी प्रत्यक्षात कुठे वापरली जाणार याबाबत मालक अनभिज्ञ होते. सुरुवातीला साबळे याने भाडे दिले मात्र पुढे भाडे मिळेनासे झाले. चौकशी करता साबळे हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अनेक महिने असे घडल्यावर काहींनी पोलीस ठाणे गाठले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. ऐन दिवाळी सणाच्या वेळी आपल्या गाडीचे नेमके काय झाले असावे? या भीतीने गाडी मालकांना धडकी मात्र भरली आहे. शिवाय पोलीस, कोर्ट- कचेरी करावी लागणार आहे हे वेगळेच.

खेड पोलिसांनी चार पथके तयार केली असून सध्या बीड जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. आत्तापर्यंत ११ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी भोसरी पोलिसांच्या कस्टडीत आहे. लवकरच नेमका प्रकार समोर येईल.
-भारत भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, राजगुरूनगर

Back to top button