बाणेर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बोपोडी, सूस, महाळुंगे परिसरामध्ये गुरुवारी पुकारण्यात आलेल्या 'बंद'ला व्यावसायिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती
मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढल्या.
संबंधित बातम्या :
बाणेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सर्व रॅलींतील कार्यकर्ते एकत्र जमले. या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्ते बालेवाडी फाटा येथील उपोषणस्थळी आले. या वेळी 'एक मराठा, लाख मराठा', 'मराठा समाजास आरक्षण मिळालेच पाहिजे', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे,' अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. परिसरातील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, जालना येथील आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याची सखोल चौकशी करण्यात यावी, सारथी संस्थेच्या निधी व उपक्रमांमध्ये वाढ करण्यात यावी, एखाद्या गावामध्ये मराठा समाजाच्या भावकीमध्ये ओबीसी प्रमाणपत्र असल्यास, त्या आधारे त्या गावातील आडनावाच्या सर्वांना अर्ज प्रक्रियाद्वारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे, जातीय जनगणना करण्यात यावी, तसेच बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, आदी मागण्या या वेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.
हेही वाचा