पुण्यात प्लास्टिकबंदी फक्त नावालाच; प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष | पुढारी

पुण्यात प्लास्टिकबंदी फक्त नावालाच; प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

पौडरोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पौडरोडवरील बहुतांश भागात प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. या भागातील भाजीविक्रेते, फळविक्रते, किराणा मालाच्या दुकानदारांकडून सहजपणे ग्राहकांना या पिशव्या दिल्या जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. बंदी असतानाही पिशव्या उपलब्ध होत असल्याने प्लास्टिक बंदी ही नावापुरतीच असल्याचे चित्र पौडरोड परिसरात दिसून येत आहे.

राज्यात सध्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी होती. पण काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कायद्यात सुधारणा करुन कायद्याची अंमलबजावणी न करणार्‍या हॉटेल व्यावसायिक आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना तीन ते सहा महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याची तरतूद होती. त्याची अंमलबजावणी काही काळ करण्यात आली. परंतु कालांतराने परिस्थिती तशीच आहे.

या प्लास्टिक पिशव्यांमुळे अनेक ठिकाणी पावसाळी पाण्याच्या व सांडपाण्याच्या पाईप लाइन तुंबत आहेत. या प्लास्टिक पिशव्यांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. कचर्‍यात टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ड्रेनेज लाइन मध्ये जाऊन पाण्याच्या प्रवाहाला अर्थळा निर्माण करत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी चेंबरदेखील तुंबत असतात आणि मैलायुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

उत्पादनावरच बंदी हवी

माजी नगरसेविका वैशाली मराठे म्हणाल्या की, पुन्हा बाजारात प्लास्टिक पिशव्या दिसू लागल्या आहेत. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, असे सांगितले जात आहे. मात्र, महानगरपालिकेकडून मुळावरच घाव घातला जात नाही. याचबरोबर प्लास्टिकच्या उत्पादनालाच बंदी घातली तर प्लास्टिक बंदीचा प्रश्नच उद्भवणार नाही.

विविध दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, भाजी विक्रेते यांपैकी कोणाजवळ प्लास्टिक पिशवी दिसल्यास यांच्यावर कारवाई करत असतो. आमच्या या कारवाईसाठी पोलिस प्रशासनानेदेखील हातभार लावला तर काही प्रमाणात यावर नियंत्रण आणता येईल.

– राम सोनवणे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,
कोथरूड क्षेत्रिय कार्यलय

हेही वाचा

गणेश उत्‍सव २०२३ : आरती श्री गणपतीची (हिंदी)

बागमती नदीत ३० मुलांना घेवून जाणारी बोट उलटली, १० बेपत्ता

पुणे विभागात 182 कृषी सहायकांची रिक्ते पदे भरणार

Back to top button