रा. स्व. संघाची आजपासून पुण्यात बैठक; तीन दिवस आयोजन

रा. स्व. संघाची आजपासून पुण्यात बैठक; तीन दिवस आयोजन
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक 14 ते 16 सप्टेंबरदरम्यान पुण्यात होत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या बैठकीला 36 संघटनांचे 266 प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राममंदिर मुद्द्याबरोबरच समान नागरी कायदा या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर काय निर्णय घेतला जातो, याची उत्सुकता रंगली आहे. बैठकीबाबतची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी (दि. 14) पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यातील टिळक रोडवरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये होत असलेल्या तीन दिवसीय बैठकीत पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. पत्र परिषदेत संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते.

आंबेकर म्हणाले, 'बैठकीत सहभागी होणार्‍या सर्व संघटना संघप्रेरित असून, सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्या स्वायत्तरीतीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि गरजेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील, याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असेही आंबेकर यांनी स्पष्ट केले.

राजकीय विषयावर मौन….

बैठकीबाबत माहिती दिल्यावर पत्रकारांनी आंबेकर यांना राजकीय मुद्द्यावर घेरण्याचा प्रश्न केला. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आढावा घेऊन सुधारणा करण्याची चर्चा होऊ शकते का? , बैठकीसाठी इतर संस्थांसह भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह बी. संतोष उपस्थित राहणार आहेत. परिणामी, राममंदिर आनंदोत्सव साजरा केला जाण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, 'मला याबाबत तुमच्याकडूनच कळतेय.'

आयाराम नेत्यांना शिस्त….

राज्यात झालेली उलथापालथ अन् नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना संघाची शिस्त आणि प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल का? या प्रश्नावरही आंबेकर यांनी सांगितले, की बैठकीत काय चर्चा होते, याचे आता सांगणे अवघड आहे. मात्र, संघ हा शिस्तीचा असून, येथे नियम पाळावेच लागतात. बैठकीचा समारोप 16 सप्टेंबर रोजी होणार असून, त्याच दिवशी सर्व बाबींचा खुलासा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

व्हीव्हीआयपी फक्त संघचालक

बैठकीसाठी कोणी व्हीव्हीआयपींना बोलावण्यात आले आहे का? या प्रश्नावर आंबेकर म्हणाले, 'तुम्ही कोणाला व्हीव्हीआयपी मानता, हे आम्हाला माहीत नाही. आमच्या माहितीत व्हीव्हीआयपी म्हणजे फक्त सरसंघचालक हेच आहेत. आम्ही त्यांच्याशिवाय दुसरे कोणाला व्हीव्हीआयपी मानत नाही. बैठक वगळता सर्व संघचालकाचे पुणे शहरात तीन ते चार वेगवेगळे कार्यक्रम असून, आपण त्यांना थेट भेटून काय बोलायचे ते बोलू शकता, विचारू शकता.'

बैठकीचे उद्घाटन सकाळी 9 वाजता….

बैठकीचे उद्घाटन गुरुवारी (दि. 14) सकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या वेळी डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहनजी वैद्य, अरुण कुमार, मुकुंदाजी आणि रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

32 संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती…

या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

पुढील बैठक भूजमध्ये….

सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल, असा समरसतापूर्ण व्यवहार, अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे. गेल्या वर्षीची बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती. पुढील बैठक गुजरातच्या भूजमध्ये होणार असून, त्यानंतरची बैठक नागपूरमध्ये होणार असल्याची माहिती आंबेकर यांनी दिली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news