राज्यातील अधिकार्‍यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते 46 वाहनांचे हस्तांतरण | पुढारी

राज्यातील अधिकार्‍यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते 46 वाहनांचे हस्तांतरण

पुणे : बदल्यांच्या फेर्‍यात अडकलेल्या आरोग्य अधिकार्‍यांसाठी आलिशान गाड्या देत आरोग्य विभागाने त्यांची बडदास्त ठेवली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून अधिकार्‍यांच्या दिमतीला 46 नव्या कोर्‍या गाड्या दाखल झाल्या आहेत. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनीच मंगळवारी गाड्या सुपूर्त केल्या.

राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य उपसंचालक आणि सहायक संचालक यांच्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी 46 वाहनांचे मंगळवारी हस्तांतरण केले. आरोग्य आयुक्त, आरोग्य सेवा अंतर्गत राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिकार्‍यांना पर्यवेक्षकीय कामकाज सुरळीत पार पाडता यावे यासाठी वाहन खरेदीकरिता 3 कोटी 68 लाख रुपये इतक्या खर्चास शासनाने मंजुरी दिली होती.

राज्यातील 5 उपसंचालक, 11 सहायक संचालक, 14 जिल्हा आरोग्य अधिकारी व 16 जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयाला ही वाहने हस्तांतरित करण्यात आली आहेत. या वेळी विभागीय उपायुक्त वर्षा ऊंटवाल-लड्डा, रामचंद्र शिंदे, उपसंचालक कैलास कराळे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

गाड्या धडकवू नका

आरोग्यमंत्री डॉ. सावंत हे कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या दोन तास उशिरा दाखल झाले. ते दाखल होताच, ‘चला उरका’, असे म्हणत लगीनघाई सुरू केली. कंपनीकडून प्रातिनिधिक स्वरूपात गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर चालकांसोबत फोटो सेशन झाले. त्या वेळी चालकांना नव्याकोर्‍या गाड्या देत आहोत, गाड्याची दुरुस्ती काढू नका, गाड्या कुठे धडकवू नका, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी केल्या.

हेही वाचा

पुणे जिल्ह्यात 63 ब्लॅक स्पॉट; झिरो कधी होणार?

नगर : कपात 109 रुपये न दिल्यास ‘घुलेंना’ गाळप परवाना नाही

पुणे : डायजीन औषधांची विक्री थांबवण्याच्या सूचना

Back to top button