Pune Teacher News : तासिकेवरील शिक्षकांची वेठबिगारी थांबवा | पुढारी

Pune Teacher News : तासिकेवरील शिक्षकांची वेठबिगारी थांबवा

गणेश खळदकर

पुणे : उच्च माध्यमिक विभागातील अकरावी-बारावीला शिकविणा-या शिक्षकांना डिसेंबर 2022 पासून वाढीव दराने (150 रुपये प्रतितास) तासिकेचे पैसे मिळत आहेत. मात्र, अधिक दोन स्तरांवर अकरावी-बारावीला शिकविणा-या शिक्षकांना जुन्या दराने ( 48 रुपये) तासिकेप्रमाणे पैसे मिळत आहेत. त्यामुळे एकच शिक्षण विभाग असताना महाराष्ट्रातील तासिका तत्त्वावर काम करणार्‍या दोन प्रकारच्या शिक्षकांमध्ये भेदभाव केला जात असून, संबधित जुन्या दराने पैसे मिळणार्‍या शिक्षकांची वेठबिगारी नेमकी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पारंपरिक अकरावी-बारावीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांना शिकवणार्‍या तासिका तत्त्वावरील शिक्षकांना 150 रुपये तासिकेप्रमाणे पैसे दिले जात आहेत. परंतु, अकरावी-बारावीला समकक्ष असणार्‍या व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे काही नियोजित विषय आणि काही अधिक दोन स्तरचे विषय यामध्ये बिल्डिंग मेंटेनन्स किंवा संगणकासंदर्भातील काही अभ्यासक्रम शिकवणार्‍या शिक्षकांना केवळ 48 रुपये तासिकेप्रमाणे पैसे दिले जात आहेत.

त्यामुळे अकरावी-बारावी पांरपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम हे जर शासनाने समकक्ष ठरविले असेल, तर तासिकेची रक्कम सारखीच ठेवणे गरजेचे आहे. असे असताना शासन संबंधित शिक्षकांमध्ये दुजाभाव का करत आहेत, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयाप्रमाणे अधिक दोन स्तरांवरील शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा आणि अल्प मानधनावर काम करणार्‍या कर्मचारी वर्गाला तत्काळ न्याय मिळावा, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणपतीची वर्गणी न दिल्याने दुकानदाराला बेदम मारहाण; कार्यकर्त्यांवर गुन्हा

पुणे जिल्ह्यात 63 ब्लॅक स्पॉट; झिरो कधी होणार?

शास्त्रशुद्ध पद्धतीने जल नियोजन व्हावे!

Back to top button