पुणे विद्यापीठ चौकात पर्यायी मार्गांची निश्चिती | पुढारी

पुणे विद्यापीठ चौकात पर्यायी मार्गांची निश्चिती

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाचा पाया घेण्याचे काम सुरू झाले असून, पूल उभारणीच्या सुमारे वर्षभराच्या काळात वाहनचालकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांची निश्चिती संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणीनंतर केली. उड्डाणपुलाचे काम 15 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच पुम्टाच्या बैठकीत दिला होता. त्यानंतर या कामाचा पाठपुरावा करणारे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयामध्ये बोलावली.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, विवेक खरवडकर, रिनाज पठाण, वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, पुणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, टाटा कंपनीचे प्रकल्प संचालक अक्षय शर्मा यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य अडचणी, त्याच्या सोडवणुकीला लागणारा कालावधी, वाहतूक कोंडी सोडविण्याचे विविध पर्याय, यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर त्यांनी चौक, नियोजित पर्यायी मार्गांची जागा पाहणी केली.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावर विद्यापीठ चौकात डबलडेकर उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. टाटा कंपनीकडून पुलाचे बांधकाम करण्यात येत असून, महापालिकेतर्फे नंतर गणेशखिंड रस्त्याने औंधकडे जाण्यासाठी ग्रेडसेपरेटरचे काम केले जाणार आहे.

  • चौकात खांबाच्या पायलिंगचे काम संपल्यानंतर औंधच्या बाजूला पुलाचा रॅम्प उभारण्यास पोलिस परवानगी देणार हे काम 15 ऑक्टोबरनंतर सुरू होईल.
  • विद्यापीठात मिलिनियम गेटमधून दुचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव.
  • त्या मार्गाने रेंजहिल्सकडे जाता येईल.
  • बाणेर बाजूच्या रॅम्पच्या जागेत 1200 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी असल्याने काम रखडले.
  • सध्याचा 36 मीटर रुंदीचा रस्ता 45 मीटर रुंदीचा करणार.
  • रुंदीकरणासाठी 23 पैकी 15 जागा महापालिकेच्या ताब्यात.
  • चतुःशृंगीकडून मॉडेल कॉलेजमधून पाषाणला जाणार्‍या दुचाकीसाठी पर्यायी मार्ग करणार.

उड्डाणपुलाच्या कामाचा आत्तापर्यंतचा प्रवास…

विद्यापीठ चौकातील जुना उड्डाणपूल कोरोना साथीच्या लॉकडाऊनच्या काळात जुलै 2020 मध्ये पाडला. गेली तीन वर्षे येथे रोज वाहतूक कोंडी होते आहे. त्याबाबत विधानसभेत सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर पुम्टाची बैठक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. तेव्हा जानेवारी 2024 पर्यंत पूल बांधण्याचे ठरले. मात्र, अद्यापही ते सुरू झाले नाही. आता पायलिंग मशिनने पुलाच्या खांबाचा पाया घेण्यास सुरुवात झाली आहे. हा पूल उभारल्यानंतर त्यावरील सहा लेनमुळे तसेच ग्रेडसेपरेटरमुळे येथील वाहतूक वेगवान व सुरळीत होईल. दरम्यान, पुढील वर्षभर येथे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले, तरी गर्दीच्या वेळी वाहनचालकांना कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.

पुलाची लांबी 1.7 किलोमीटर

  • गणेशखिंड रस्त्यावरील पुलाची लांबी 1.15 किलोमीटर
  • गणेशखिंड, बाणेर रस्त्यावरील रॅम्पची लांबी 140 मीटर
  • ग्रेडसेपरेटरपासून पहिल्या पुलाची उंची 9 मीटर
  • ग्रेडसेपरेटरपासून मेट्रोच्या दुसर्‍या पुलाची उंची 9 मीटर

उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग करण्यासाठी येणार्‍या अडचणी आजच्या बैठकीत दूर केल्या. रस्तारुंदीकरण आणि काम थोडे पूर्ण झाल्यानंतर वाहनांसाठी थोडी अधिक जागा मिळेल. वाहतूक पोलिसही औंधकडून विद्यापीठ चौकाकडे जाण्यासाठी गर्दीच्या वेळी एक जादा लेन करण्याच्या प्रयत्नात आहेत.

– सिद्धार्थ शिरोळे, आमदार

हेही वाचा

पुणे : अपर आयुक्तांसह दोन उपायुक्तांवर वाहतुकीची धुरा

Pune Police : आता पुणे पोलिस आयुक्तालयात सहा झोन! गृह विभागाने प्रस्ताव मागविला

Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज

Back to top button