उद्धव ठाकरेंच्या ’होऊ दे चर्चा’ची सुरुवात बारामतीतून

उद्धव ठाकरेंच्या ’होऊ दे चर्चा’ची सुरुवात बारामतीतून

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'होऊ दे चर्चा' हा नवा उपक्रम राबविला जात आहे. बारामतीतून या उपक्रमाची सुरुवात आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झाली. आमदार अहिर यांनी यानिमित्ताने बारामती तालुक्याचा दौरा केला. वडगाव निंबाळकर येथे त्यांची सभा पार पडली. इंदापूर व दौंड तालुक्याचा दौरा ते करत आहेत. यासंबंधीची माहिती त्यांनी दिली.

आमदार अहिर म्हणाले, केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. उलट प्रत्येक विषयावर राजकारण केले आहे. याबाबतचा लेखाजोखा 'होऊ दे चर्चा' या माध्यमातून नागरिकांसमोर मांडणार आहोत. सेना व राष्ट्रवादीच्या फुटीबाबत बोलताना अहिर म्हणाले, 25 वर्षे आम्ही भाजपसोबत होतो. पण त्यांच्याकडून पाहिजे तसा न्याय मिळाला नाही. अडीच वर्षे आमचे सरकार असताना ओरड करणारेच आता राष्ट्रवादीसोबत आहेत. आता आम्ही येणार्‍या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. विरोधकांची रिकामी झालेली जागा भरून काढण्यावर आमचा भर असेल. जनतेच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरणार असल्याचेही या वेळी ते म्हणाले.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना ते म्हणाले, जालन्यातील घटनेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ आमचे नेतेही तेथे गेले. सरकारला जाग आणण्याचे काम आम्ही केले. यापूर्वी विरोधी पक्षात असलेले नेते मराठा आणि धनगर आरक्षण दोन महिन्यांत देऊ म्हणायचे. पण सत्तेत आल्यावर ते आरक्षणाचा विषय केंद्राकडे असल्याचे सांगू लागले. आम्ही या प्रश्नावर राज्यपालांचीही भेट घेतली. आता संसदेचे विशेष अधिवेशन होत आहे. त्यामध्ये हा विषय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. त्यातून भाजपचीही भूमिका समजेल. त्यांनी ठराव आणावा आणि हा विषय मार्गी लावावा, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा लवकरच पुणे जिल्हादौरा…
'इंडिया'ची बैठक होणार समजले की लगेच गॅसचा दर कमी झाला. लोकांच्या मनात 'इंडिया' जातेय हे पाहून आता 'इंडिया' आणि भारत हा मुद्दा उपस्थित केला गेला. केवळ राजकीय स्वार्थासाठी हे सगळे सुरू आहे. मागील महिन्यात उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. बारामती लोकसभेला काही देऊ न शकल्याची आणि ज्यांना दिले ते सोबत राहिले नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांचा लवकरच पुणे जिल्हा दौरा आयोजित केला जाणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.

फुटून गेलेले आमदार संपर्कात
जे आमदार शिवसेनेतून फुटून गेले तेच लोक आम्हाला आता संपर्क करायला लागलेले आहेत. काही लोक राष्ट्रवादीवर टीका करत होते; मात्र राष्ट्रवादी सत्तेत आल्यानंतर त्यांच्या गळ्यात हार घालायला हीच लोक पुढे होती, असे म्हणत त्यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे नाव न घेता टोला लगावला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news