

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट आहे. शेत शिवारात पिके करपू लागली आहेत. नदी, नाले, ओढे कोरडे पडले आहेत. सरासरीपेक्षा कमी प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे, तर काही ठिकाणी न पडल्याने जमिनीतील पाणीपातळी खालावली आहे. पुरंदरचा शेतकरी यामुळे चिंतेत पडला आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांचे फार नुकसान झाले होते, त्या नुकसानीचे एक वर्षे उलटून गेले तरीही भरपाईचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. यावर्षी पावसाने खरीप हंगाम संपत आला असताना दडी मारल्याने येथील शेतकरी चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर पाण्याचे संकट उभे राहिले आहे. पाऊस पडेल की नाही याची शाश्वती नाही, अशा परिस्थितीत हाता तोंडाशी आलेला घासदेखील हिरावून घेतला जात आहे, असे चांबळी येथील शेतकरी दत्तात्रय शेंडकर यांनी सांगितले.
पुरंदरच्या पश्चिम भागात प्रामुख्याने पालेभाज्या, फळे, फुले अशा प्रकारची शेती केली जाते; परंतु अनेक पिके पावसाअभावी जळून गेली आहेत. पुढील काळात जनावरांच्या चार्याची समस्या उद्भवणार आहे. या गंभीर समस्येलासुद्धा सामोरे जावे लागणार आहे. शेतीमध्ये बी-बियाणे, खते, पेरणी यासाठी केलेला खर्च देखील वाया जाणार आहे. या सर्व संकटामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे, अशी व्यथा वाटाणा उत्पादक शेतकरी गोरख शेंडकर यांनी मांडली.
शासनाच्या कोरड्या घोषणा
प्रत्येक वेळी शासन फक्त आश्वासन देते, पण त्याची अंमलबजावणी योग्य वेळेत होत नसल्याने शेतकर्याला हताश व्हावे लागते. शेतकरी निराश न होता पुन्हा नव्याने पेरणी करतो; परंतु पावसाअभावी अशा नुकसानीला प्रत्येक वेळेस त्याला सामोरे जावे लागते, त्यामुळे शेतकरी कायम संकटात सापडला जातो. शेतकर्यांना योग्य ती मदत सरकारने जर केली व ती वेळेतही मिळाली तर शेतकर्याला थोडंसं का होईना मदतीची साथ मिळेल, अशी खंत वाटाणा उत्पादक शेतकरी भाऊसाहेब कामठे यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा :