– विलास आपटे, पुसेसावळी
रविवार रात्री आठ ते नऊची वेळ. येथील दत्त चौकात अचानकपणे दंग्याचा आवाज…. ज्यूसचा गाडा रस्त्यावर… युवकांची धावपळ… आणि पुढचा काही काळ तणावाचा … दगडफेकीचा आणि गाड्या जाळपोळीतला… रस्त्यावर युवकांची धावपळ आणि ग्रामस्थांची घरे बंद… कोण कोठे जातो, काय करतो कोणाला समजायच्या आत हिंदू-मुस्लिम ऐक्याने राहणारी पुसेसावळी क्षणार्धात भयभीत व गर्भगळीत झाली. पुसेसावळीच्या ऐक्याला कोणाची तर नजर लागली… अशा विचारात सार्या गावाने रात्र जागून काढली.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे देवदेवतांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मोर्चा निघाला. पुसेसावळीतल्या जनतेला मात्र या घटनेचा धक्का बसला. या धक्क्यातून पुसेसावळीकर सावरतात न सावरतात तोच रविवारच्या सोशल मीडियावरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पुन्हा एकदा पुसेसावळीकर हतबल झाले. रात्रीच्या वेळी अचानकपणे सुरू झालेला गोंधळ पाहून सगळे अचंबीत होऊन गेले होते. जमावाकडून वाहनांची जाळपोळ होत होती. तेव्हा एक गट भयभित झाला होता. सदरची घटना घडण्यापूर्वी अनेक दिवस पुसेसावळीत धुसपूस चालल्याची चर्चा होत होती. या ना त्या कोणत्याही कारणास्तव जणू एकमेकांना पाण्यातच पाहिले जात होते, असे काही दृश्य यावेळी दिसत होते. अधिक मास पारायण सोहळ्याच्या वेळी एक समाज दुसर्या समाजाच्या बांधवांच्या कार्यक्रमात सेवा करत होते. त्याच बांधवांकडून असा प्रकार घडेल का? सर्व समाज ऐक्यानं नांदणारे गाव या थरापर्यंत जाईल का? या विचारात पुसेसावळीकरांची रात्र कधी उजडली हे त्यांना कळलेच नाही. दिवस उजाडताच दिसला तो पोलिस बंदोबस्त.
पोलिस आपले कर्तव्य पार पडत होते. रस्त्यावर चिटपाखरुही फिरत नसल्याने घडलेल्या घटनेची दहशत प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. पोलिस अधिकारी व कर्मचारी आपले कामचोखपणे बजावत होते. या घटनेत दुर्दैवाने बळी गेलेला नुरहसन हा मात्र नेहमी मराठी युवकांच्यात वावरणारा होता. तोच या घडलेल्या घटनेत हकनाक बळी पडला. याचे सर्वांना आश्चर्य वाटून राहिले. सोमवारी दिवसभर असलेली शांततादोन समाजाच्या ऐक्याला छेद तर देऊन गेली नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात अनुत्तरीतच राहून गेला.