दांडीबहाद्दरांमुळे पानशेत खोर्‍यातील शाळा बंद | पुढारी

दांडीबहाद्दरांमुळे पानशेत खोर्‍यातील शाळा बंद

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे पानशेत धरणखोर्‍यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वारंवार बंद असल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे येथील दुर्गम खेड्या-पाड्यांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 15 दिवस शाळा न उघडता शिक्षक मात्र दर महिन्याला गडगंज पगार घेत आहेत. दुसरीकडे, सुस्तावलेल्या शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी कागदावर रेघोट्या मारून शासनाची वर्षानुवर्षे फसवणूक करीत आहेत.

टेकपोळे (ता. वेल्हे) गावात विद्यार्थी नसताना एका शिक्षकाने स्वतःच्या मुलीला शाळेत दाखल करून तीन वर्षे एकाच विद्यार्थ्यावर शाळा सुरू ठेवली होती. तर, गावात विद्यार्थी नसताना दूर अंतरावरील गावातून विद्यार्थी आणून काही शिक्षकांनी शाळा सुरू ठेवली, असे प्रकार पुढे आले आहेत. त्यानंतर आता शिरकोली गाव व साळेकरवस्ती शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून शिक्षक सारख्याच दांड्या मारत असल्याचे समोर आले आहे. साळेकरवस्ती शाळेत एकच शिक्षक आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. जूनपासून शिक्षक 15-20 दिवसांनी एकदा शाळेत येऊन हजेरी लावून जातो, पगार मात्र दर महिन्याला घेत आहे. कष्टकरी मजूर, आदिवासी, धरणग्रस्तांची मुले शाळेच्या आवारात दिवसभर शिक्षक येण्याची वाट पाहत असतात. मात्र, शिक्षकच येत नाही. अखेर दिवस मावळतीला डोंगरकडे चढून विद्यार्थी घरी जात आहेत.

शिरकोली गावातील शाळेतही शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. येथे दोन शिक्षक आहेत. दूर अंतरावरून येणारे शिक्षक कसेबसे 11-12 वाजता येतात आणि दुपारी 3 वाजता शाळा बंद करून पसार होतात. अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

अनेक महिन्यांपासून दोन्ही शाळांतील कामचुकार शिक्षकांमुळे गोरगरिबांच्या मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे. मुलांना साधे लिहिता-वाचता येत आहे. मुलांची गुणवत्ता घसरली आहे. यास जबाबदार असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी.
                                                  – अमोल पडवळ, सरपंच, शिरकोली

शिरकोली येथील दोन्ही शाळांतील शिक्षकांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही केली जात आहे. दोषी शिक्षकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
                  – चंद्रकांत उगाले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, वेल्हे तालुका पंचायत

हे ही वाचा :

अहमदनगरमधील अदृश्य शक्ती काँग्रेससोबत; आ. बाळासाहेब थोरात यांचा दावा

पुणे : सारसबाग खाऊगल्लीच्या पुनर्वसनाची फाईल गहाळ

Back to top button