फिलीपाईन्समधील मेडिकलचे 25 हजार विद्यार्थी अडचणीत ; ‘एनएमसी’ने वैद्यकीय शिक्षण ठरवले अमान्य | पुढारी

फिलीपाईन्समधील मेडिकलचे 25 हजार विद्यार्थी अडचणीत ; ‘एनएमसी’ने वैद्यकीय शिक्षण ठरवले अमान्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) परदेशातील वैद्यकीय पदवी शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 18 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. मात्र, हा अध्यादेश प्रसिद्ध होण्यापूर्वी फिलिपाईन्समध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनाही हा अध्यादेश लागू असल्याचे ‘एनएमसी’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशातील 25 हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राज्यातील 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

एनएमसीच्या अध्यादेशानुसार एनएमसीने फिलीपाईन्समध्ये बीएस + एमडीच्या वैद्यकीय शिक्षणाला अमान्य ठरवले आहे. या शिक्षणात विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पकडून साडेपाच वर्षांचे शिक्षण पूर्ण होत आहे. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध होण्यापूर्वीपर्यंत या शिक्षणाला एनएमसीची मान्यता होती. एनएमसीने अचानक राजपत्र प्रसिद्ध करीत, संबंधित शिक्षणाला अमान्य ठरविण्याची भूमिका घेतली. यामध्ये अध्यादेशामध्ये 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही नियम लागू केला आहे.

भारतात प्रत्येक विद्यार्थ्याला आर्थिक तसेच प्रवेशाच्या तीव्र स्पर्धेमुळे एमबीबीएसचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी फिलीपाईन्समधील मान्यताप्राप्त कॉलेजांमध्ये कमी शुल्कात बीएस + एमडीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर एनएमसीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी अध्यादेश प्रसिद्ध करीत, बीएस पदवीला अमान्य ठरवले आहे.

दुजाभाव कशासाठी? पालकांचा सवाल
या पद्धतीने शिक्षण पूर्ण करणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांना देशात परतल्यानंतर दीड वर्षाची पुन्हा इंटर्नशिप करावी लागणार आहे. त्याचवेळी एमएनसीने अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. युक्रेनच्या विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाची परवानगी आहे. फिलीपाईन्समध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांबाबतच दुजाभाव का, असा प्रश्न शैक्षणिक वर्ष 2020-21 आणि 2021-22 या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

उचगावच्या तरुणास नोकरीच्या आमिषाने साडेसात लाखांचा गंडा

पावसाची बातमी ! राज्यात दोन दिवस हलका पाऊस

Back to top button