पुणे : सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांना मिळणार नुकसानभरपाई | पुढारी

पुणे : सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांना मिळणार नुकसानभरपाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसानभरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकर्‍यांना द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स’ विमा कंपनीला दिले आहेत.

पावसात 3-4 आठवड्यांपेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि पर्जन्यातील असाधारण कमी-जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा जास्त तफावत) या प्रातिनिधीक सूचकांच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर या पिकांचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यानुसार सदर महसूल मंडळ गटातील सर्व पीक विमाधारक शेतकर्‍यांना संभाव्य नुकसानभरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम 1 महिन्याच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीक विमाधारक शेतकर्‍यांना विमा कंपनीने नुकसानभरपाई अदा केल्यानंतर पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे निश्चित होणार्‍या नुकसानभरपाईसाठी पात्र राहतील व नुकसानभरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणार्‍या नुकसानभरपाईतून समायोजित करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

नुकसान झालेले महसूल मंडळ : बाजरी

हवेली- कळस, भोसरी, वाघोली, मोशी, खराडी, लोणीकंद, हडपसर, उरुळी कांचन, थेऊर, उरुळी देवाची, मोहम्मदवाडी, फुरसुंगी, अष्टापूर, लोणीकाळभोर, आंबेगाव तालुका- पारगाव, निरगुडसर, शिरूर तालुका- शिरूर, रांजणगाव गणपती, निमोणे, टाकळीहाजी, मलठण, पाबळ, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, न्हावरा, वडगाव रासाई, इंदापूर तालुका- इंदापूर, लोणीदेवकर, बावडा, पळसदेव, लाखेवाडी, माळवाडी, निमगाव केतकी, काटी, अंथुर्णे, भिगवण, लासुर्णे, सणसर, दौंड तालुका- दौंड, देऊळगाव राजे, रावणगाव, गिरीम, केडगाव, वरवंड, पाटस, बोरीपारधी, यवत, बोरीभडक, खामगाव, राहू, कुरकुंभ, वडगाव बांडे, पुरंदर- सासवड, भिवडी, राजेवाडी, जेजुरी, कुंभारवळण, शिवरी, परिंचे, वाल्हा.

सोयाबीन : जुन्नर तालुका- जुन्नर, राजूर, आपटाळे, ओतूर, मढ, वडगाव आनंद, डिंगोरे, नारायणगाव, वेल्हा, निमगाव सावा, वडज, ओझर, आंबेगाव तालुका- घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर, पारगाव, निरगुडसर, खेड तालुका गट, बारामती तालुका गट, इंदापूर तालुका गट.

कांदा : पुरंदर तालुका गट, इंदापूर तालुका गट, बारामती तालुका गट, दौंड तालुका गट.

हेही वाचा

जी-२० परिषदेची सांगता; अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द

पुणे जिल्ह्यातील धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज; घ्या जाणून धरणातील पाणीसाठा

पुण्यात प्रथमच फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन; मल्हार सागर धरणावर पक्षांचे आगमन

Back to top button