चोरीला गेलेले देवाचे दागिने शोधण्यात पोलिसांना यश | पुढारी

चोरीला गेलेले देवाचे दागिने शोधण्यात पोलिसांना यश

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  श्री क्षेत्र ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे चोरीला गेलेले दागिने शोधण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले. शुक्रवारी (दि. 8) हे दागिने पोलिसांनी ग्रामस्थांकडे सुपूर्त केले. दागिन्यांचा अल्पावधीतच छडा लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. श्री खंडोबा देवाचे अडीच ग्रॅम सोन्याचे डोळे चोरट्यांनी ऑगस्ट महिन्यात चोरून नेले होते. याबाबत देवाचे पुजारी शरद गुरव यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी तपासासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके रवाना केली. दरम्यान, या दागिन्यांचा शोध लावून पोलिसांनी आरोपीस अटक केली. चोरीतील दागिने पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शुक्रवारी ग्रामस्थांकडे सुपूर्त केले. त्यानंतर धार्मिक विधी व पूजाअर्चा करून सोन्याचे डोळे देवाला बसविण्यात आले.

दागिने परत मिळाल्याने पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार डी. आर. शिंदे, विजय शिंदे, ब्रह्मा पोवार यांचा फेटा बांधून आणि शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांनी सत्कार केला. सरपंच शोभा शेलार, माजी सरपंच खंडू मलगुंडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाचंगे, सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, दशरथ पाचंगे, आंबेगाव-शिरूर काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, भाऊसाहेब पाचंगे, पोलिस पाटील दिपक मलगुंडे, बापू मलगुंडे, रावसाहेब पाचंगे, रणजित पाचंगे, उदय पाचंगे, रामदास मलगुंडे, दशरथ शेलार, विनायक मलगुंडे या वेळी उपस्थित होते. दरम्यान, माजी सैनिक भाऊसाहेब पाचंगे व वीरपत्नी अनिता पाचंगे यांचा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पोपटराव पाचंगे यांनी केले. तर मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Ajit Pawar : शिक्षकांनी आधी चांगलं इंग्लिश शिकायाला हवं; अजित पवारांनी शिक्षकांचे टोचले कान

पुणे : मानसिकतेपासून तंत्रज्ञानापर्यंत पुनर्विचार आवश्यक

Back to top button