पुणे : मानसिकतेपासून तंत्रज्ञानापर्यंत पुनर्विचार आवश्यक | पुढारी

पुणे : मानसिकतेपासून तंत्रज्ञानापर्यंत पुनर्विचार आवश्यक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : झपाट्याने बदलत जाणारे तंत्रज्ञान आणि कौशल्यांचा वेध घेतला असता मनुष्यबळ क्षेत्रात तंत्रज्ञानापासून मनुष्यबळ नेतृत्वाच्या मानसिकतेत प्रचंड बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांनी
व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतर्फे एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नॅटकॉन 2023’ या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी बाबा कल्याणी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, ‘एनआयपीएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, डॉ. संतोष भावे, कल्याण पवार आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. संतोष भावे आणि पी. प्रेमचंद यांना ‘एनआयपीएमरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कल्याणी म्हणाले की, आता तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने गरुडझेप घेतली असून, चीनसारख्या स्पर्धकांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विश्वास कमावला आहे. कोरोना काळात आपल्यासह जगाला चांगलाच धडा मिळाला असून, प्रगतीचा आणि सेवासुविधेचा वेग प्रचंड ठेवावा लागणार आहे. हा वेग आपण कायम ठेवू शकलो, तरच आपण आपले स्थान कायम ठेवू शकू. आजच्या डिजिटल युगात कौशल्याची व्याप्ती आणि व्याख्या बदललेली असून, कौशल्ये केवळ उत्पादन घेण्यापुरते मर्यादित नाहीत. तंत्रज्ञानामुळे अनेक आव्हानांसह संधीदेखील खुल्या झाल्या आहेत. प्रास्ताविक एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. डॉ. संतोष भावे यांनी परिषद आयोजित करण्यामागील भूमिका विशद केली.

सहृदयता, नि:स्वार्थी वृत्ती आणि निर्णयक्षमता ही नेतृत्वासाठी मूलभूत आवश्यक कौशल्ये आहेत. नेतृत्वाचे गुण जन्मत: असतात की नेतृत्व घडविले जाते, याविषयी दुमत असू शकते. पण, माझ्या मते नेतृत्वाला पैलू पाडले जातात.

– मनोज नरवणे,
माजी लष्करप्रमुख

Back to top button