बारामतीत आशा वर्कर्सची सुमारे सव्वा पाच लाखांची फसवणूक | पुढारी

बारामतीत आशा वर्कर्सची सुमारे सव्वा पाच लाखांची फसवणूक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आशा वर्कर्सच्या फसवणूकीचा प्रकार जिल्ह्यात ताजा असतानाच बारामतीतही आशा वर्कर्स यांना स्वस्तात दुचाकी देण्याचे अमिष दाखवून सुमारे २८ जणींची ५ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यात मात्र अद्याप एकच फिर्याद दाखल करून घेण्यात आली असून त्यानुसार श्रीमंत बाबुराव घोडके (रा. कोथरुड, पुणे) याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कविता प्रवीण जाधव (रा. श्रीमंत आबा गणपतीजवळ, बारामती) यांनी फिर्याद दिली. त्या २०१८ पासून आशा वर्कर्स म्हणून काम करतात. ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांच्या युनियनच्या पर्यवेक्षक लक्ष्मीप्रभा सतीश करे यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला युनियनचा सचिव श्रीमंत घोडके हा आला होता. त्याने महिलांना एक योजना सांगितली. १८ हजार ६०० रुपये भरणाऱ्या प्रत्येक महिलेला एक सिक्स जी अॅक्टीव्हा दुचाकी दिली जाईल, असे अमिष त्याने दाखवले. फिर्यादी यांनी त्याच दिवशी आॅनलाईन पद्धतीने ही रक्कम घोडके याला पाठवली. १५ आॅगस्ट २०२२ रोजी तो दुचाकी देणार होता. परंतु त्यानंतर त्याने १ जानेवारी २०२३ चा वायदा केला. त्यानंतरही दुचाकी मिळाली नाही, पैसेही परत केले गेले नाहीत.
दरम्यान फिर्यादीसह आणखी २७ महिलांनी घोडके याच्याकडे प्रत्येकी १८ हजार ६०० रुपये भरले आहेत. परंतु त्याने त्या महिलांनाही दुचाकी न देता किंवा रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी सध्या एकच फिर्याद दाखल करून घेण्यात आली आहे. या फसवणूकीची व्याप्ती मोठी असून पोलिसांनी प्रत्येक महिलेची फिर्याद घेत सखोल तपास करण्याची गरज फसवणूक झालेल्या महिलांनी व्यक्त केली.
हेही वाचा :

Back to top button