चोरट्यांची टोळी गजाआड ; रांजणगाव पोलिसांची कामगिरी | पुढारी

चोरट्यांची टोळी गजाआड ; रांजणगाव पोलिसांची कामगिरी

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी मोबाईल टॉवर, बॅटरी, विद्युत डी. पी. व शेतीपंप चोरी करणाऱ्या तिघांना अटक करून 10 गुन्हे उघडकीस आणले. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील कारेगाव फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या 46 बॅटऱ्या चोरीप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच रांजणगाव हद्दीतील खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव इत्यादी ठिकाणी इलेक्ट्रिक डी. पी. चोरीचे सत्र मागील काही महिन्यांपासून सुरू होते.

तसेच खंडाळे येथील शेतकर्‍यांच्या शेतीपंप मोटारचोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात वेळोवेळी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. या चोरी प्रकरणांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी गंभीर दखल घेऊन सदर चोरीचा छडा लावण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना दिलेल्या होत्या. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्वतंत्र तपास पथक तयार केले आहे. या पथकाला आरोपींबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांनी तपास पथकासह सापळा लावून काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्यामध्ये अख्तर अली हबीबउल्ला अली (वय 36), शाह नचून मोहम्मद (वय 23) आणि रफिक अब्दुल्ला अन्सारी (वय 40, सर्व मूळ रा. इटवा, सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. रांजणगाव, ता. शिरूर) यांचा समावेश होता. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खंडाळे, वाघाळे, गणेगाव खालसा, भांबार्डे व रांजणगाव येथील डी. पी. चोरीची तसेच खंडाळे येथील शेतीपंप मोटारचोरीची आणि कारेगाव फलकेमळा येथील मोबाईल टॉवरच्या बॅटरीचोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून 125 किलो तांब्याच्या तारा व 3 इलेक्ट्रिक शेतीपंप मोटारी तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन छोटा हत्ती टेम्पो असा एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा :

अहमदनगर ; महापालिकेत शुकशुकाट, कामकाज ठप्प; सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचार्‍यांचा संप

Teacher News : सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांना निवडश्रेणी प्रशिक्षणातून सवलत

Back to top button